Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, २४ जुलै, २०११

मी येणार नाही

Share




मी येणार नाही


आभाळाचा तुझा खंड अभेद्य आहे
डागाळलेल्या चंद्राची कोर तू लेवू नकोस
मी येणार नाही

आंदणाच्या जराने ओठ उष्टावला आहे
बस्स आणखी काही मला तू भरवू नकोस
मी येणार नाही

तुझ्या दारात उंबर्यापाशी येवून जाईन
तुझे मांगल्याचे चांदणे दुरून नेसून जाईन
पण घरात मला नेवू नकोस
मी येणार नाही

तुझ्या चांदण्यात मी जळून जाईन
माझ्या हृदयात तुझे हृदय वितळून जाईल
पुन्हा मला बोलावू नकोस
मी येणार नाही

....कविता

शनिवार, २३ जुलै, २०११

प्रीत आकळेना

Share



















प्रीत आकळेना

जायबंदी पाखरू ते वेडे
फडफड कळीस सोसेना
परी विह्वळले ग पाखरू
कळीच खुलता खुलेना

तगमग त्या जीवाची
कळीस काही उमजेना
मुक्यापरी मिटुनी जाई
कळीच खुलता खुलेना

नाजूक कोवळ्या देठाला
नाजूकता कशी वळेना
रंगुनी गेली पाकळी परी
कळीच खुलता खुलेना

देवूनी तिज मायउबारा
पाखरू ढाळे आसवांना
दवबिंदू तो हिरमुसला
कळीच खुलता खुलेना

केली आर्जवता पाखराने
आळवूनि सूर्यकिरणांना
गंध शिवुनी गेला कळीला
कळीस दरवळ सापडेना

पाकळी पाकळी उमलली
पाखरास पारावार उरेना
खुलुनी खुलली कळी परी
कळीस दरवळ सापडेना

पाहता खुलत्या कळीला
जायबंदी पंखात उरेना
शोधूनी देण्या गंध तिला
पाखरू झेपले रानावना

गंधही तीतच रुजू होता
रानही तीतच पिसे होते
पाखराच्या गुजारणात
समीरणहि दंग होते

वेड्या दोन त्या जीवास
काहीच न्हवते उमजेना
प्रेमवेडे दिवाणे सारे
अंतरीची प्रीत उमजेना

....कविता

सुटका

Share













सुटका

गर्र चाक फिरलं
रहाट गडगडल
उफ्फ दोर निसटला
घागर कलंडली
तळाशी बुडाली
तळ गाठून
पुन्हाशी वर आली
कलई काळवंडली
पोच गेला ........

जगण्याला कसला तडा गेला
अन मरणाचा घडा अर्धाच भरला
गळकी घागर ....
गोल विहरीत फिरते आहे
बुलंद भितीस धडकते आहे
गळक्या छिद्रातूनच तरंगते आहे

कधी डोळे मिचकावून
आकाशाकडे एकटक पाहते आहे
कधी डोळे गच्च मिटून
खोल पाण्यात रमते आहे

नक्की काय हव आहे तिला
जगण कि मरण ?
जगण्याची मुक्तता
कि मरणाची अधीरता ....
आकाशाची उंची
कि गर्भ जमिनीची खोली
का तिला हवी आहे
फक्त सुटका ????

......कविता

शाश्वत

Share



















शाश्वत

विखुरलेल्या पायवाटेवरती
निर्जीवत्वाच बीज भिरकल होतं
पायाला काहीतरी सलत होतं
बोथट धारेच भय सुजत होत
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं .........

चितेमध्ये ओल लाकूड
जळत होत जळत होतं
मातीच सोन होत होतं
सोन्याने मातीला मढवत होतं
भस्मात मन राख होत होतं
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं .........

चिरडलेल्या काट्याची
चिरगुट घेत घेतच
कुणीतरी जगत होतं
जगण्याला पुकारून
मरूनही जगत होत
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं .......

डसलेल्या विंचवाला दंश करीत
सावलीच सावज अंधाराला
सापडत होत सापडत होत
अन बेफिकीर उन उजाडून
छळवटून चित्कारत होत
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं ........

प्रश्न खुंटीला टांगून
निवांत उत्तर दवडत होत
विटाळलेल मन मात्र
कधीच मालवल होत
सारच काही संपल होत
पण ....
नसलेलच असण तरी का शाश्वत उरल होत ??

....कविता

बोनसाय वय

Share



















बोनसाय वय

त्याच्यात आणि माझ्यात
अंतर तर आहेच
सरलेल्या माझ्या वर्षाचं
उरलेल्या त्याच्या क्षणाच
त्याच्या सोयीने
त्यानेच मापलेलं ते ‘अंतर ‘
पण ते आज खांद्यावर चढल
माझ्या कानात कुजबुजल
“अग्ग बाळे वय मोठ झाल ”

चल अंतर मिटवू म्हणून
आवेगाने आल
पाठीवर थोडफार त्याने
ओझ ठेवलं
जबाबदारी म्हणतात याला
अस ठणकावून सांगितलं
दूर दूर वाटणार अंतर
क्षणातच का असेल मिटल ?
अस वाटताच ….
वय खोकत खोकत म्हणाल
“अग्ग बाळे वय मोठ झाल ”

सदिच्छा पत्रातला
मजकूर बदलून आल
संदेश मात्र तोच होता
चॉकलेटच्या पुढ्यात
चॉकलेट संपवून
झिरमिरी कागद घेवून आल
हिरमुसलेल्या डोळ्याशी बोललं
“अग्ग बाळे वय मोठ झाल ”

उजळत्या दिव्याच्या
साक्षीने त्याने औक्षण केल
पाटावरच्या नक्षीला
रांगोळीच्या रंगावर
अक्षताच्या सरीन
त्याने गालगुच्चे घेतले
निरांजनांतून वाहणाऱ्या
तुपाकडे पाहून म्हणाल
“अग्ग बाळे वय मोठ झाल ”

त्याच्या काळजीच्या तारेला
शोभेल अस्सच
काटेरी कुंपण घालून
जबाबदारीच्या बागुलबुवाची
भली मोठी गोष्ट सांगून
माझ्या अल्लडपणाच
बोनसाय करत म्हणाल
“अग्ग बाळे वय मोठ झाल ”

मोठ झालेलं वय
माझ्याच फांदीवर
डोक ठेवून निजल
खरच वय मोठ झाल होत
थकल होत बिच्चार

मला मोठ करण्यासाठी
किती अंतर चालून आल होत
पण त्याने घेतलेल्या काळजीने
मला आज मी आणखीन
लहान झाल्याच जाणवलं होत
पण वय पुन्हा झोपेत बडबडल
“अग्ग बाळे वय मोठ झाल ”

.....कविता

प्रतारणा

Share


प्रतारणा

काट्यातून तुझ अलगद उमलण
त्या दरवळाने मी मोहित होण
कधी कळालंच नाही .............
तू तिच्या केसात माळला होतास
मी मावळत्या कळीस हुंगत राहिले

शब्दांचा पदर घेतलेली ती कविता
रिक्त ओळीतली तुझी ती मंजूळंता
कधी कळालंच नाही ...............
तो तिच्या ओढणीचा तुकडा होता
मी माझ्या पदराला फाडत राहिले

कोरड्या टिपेच्या चंद्रात तू जाता
बंदिस्त मनात तुला साठवत गेले
कधी कळालंच नाही ................
तू निरांजनात तुपाची धार होतास
मी दुधातल्या वाती वळत राहिले

ओठाच्या कळीत साचलेली गुलाबी
त्यावर धजावणारे तुझे वेडेसे कंप
कधी कळालंच नाही .............
माझी नसलेली ती श्रुंगारता आहे
माझी रिक्तता मी शोधत राहिले

छातीवर तू झेललेले बोथट वार
पाठीवर पोळलेले अव्यक्त दाह
कधी कळालंच नाही ............
ते तीच उरलेलं अस्तित्व आहे
जखमेत खपली मी होत राहिले

माझ्याशी प्रतारणा केली होतीस
माझीच कुचंबणा मी करत होते
कधी कळालंच नाही ...........
ती तुझ सौभाग्य राखत होती
मी तुझी नुसतीच राख होत गेले ..........

......कविता

शुक्रवार, २२ जुलै, २०११

जगाची रीत.....

Share


जगाची रीत....


जगायची कोणती 'हि' आगळीच रीत आहे ?
भीतीच्या पापणीस काजळाची 'प्रीत' आहे ........!!


पिंडास शिवला म्हणून कुळे माझी आशा
भुकेला अन्नच खायची त्याची रीत आहे .........!!


मृत्युच्या सुडाने घातला जीव मी भिकेला
आता त्या प्रेतावरी गिधाडाची जीत आहे .........!!


घेत माझा वसा, ती कुरवाळी माझी काया
पाखडून आगीला, फेके ती माझी चीत आहे ......!!


तालास साथ व्यथेची, लयीला माझा हुंदका
वाह रे वा ! ते म्हणाले, सुरेख हे गीत आहे .....!!


नीलरंगी रंगले ते काळ्या विषात माझ्या
म्हणे मी दंश केला, टाकली मी कात आहे .......!!


फुकाचाच जगलो होवुनी खुशालीचा राजा
मला एवढे न कळावे,ती वादळी रात आहे ........!!


गाळली वस्त्रे काळडोहात, नवा सदरा घातला
मोजतो आता, हा सदरा कितीसा वीत आहे ......!!



.......कविता

स्वप्न.......

Share


स्वप्न.......


स्वप्न नेहमी आंधळीच असतात का ?
त्यांची वाट चाचपण्यासाठी
माझ्या मिटलेल्या डोळ्यांचा आधार घेतात
बरच वाटत कि मलाही ....
माझा आधार घेता घेता
माझा आधार होतात तेव्हा ...
.................
बस्स त्यांना एकेदिवशी
त्यांची वाट सापडते ....
जशी निमुठपणे आली ..........
तशीच निमुठपणे जातात ......
थोडासा मुठभर काळोख
डोळ्यात टाकून ......
निघून जातात
..............
माझे डोळे आंधळे करून
डोळ्यातल्या खाचेत
त्यांचे भास ठेवून
निघून जातात.....
निघून जातात.....
स्वप्ने आंधळीच असतात ..........



.....कविता (वाट इथे स्वप्नातील संपली जणू )

चांदरात (गझल )

Share

चांदरात (गझल )


शांतता शून्यात आली त्यास दे तू ताल आता
भान शब्दांचे उडाले जाग तू खूशाल आता

कोवळीशी झोप माझी, जागवीली तू कशाला
आज स्वप्नातून माझ्या सोबतीने चाल आता

लाजणारे ओठ माझे, लूट केली तू कळीची
हाय! थट्टा रंगली, झाले कळीचे हाल आता

सोडतो तू काय रे ,या बंधनाच्या त्या मिठीला
रात नाही ती तुझी, घे कुंतलेची शाल आता

माळले चाफ्यांवरी ,तू मोगरीला का अवेळी
अंबरी आहे अजूनी तारकांची झाल आता


.....कविता


वृत्त :व्योमगंगा

वेदनेस (गझल)...

Share

वेदनेस (गझल).....



गळे कापून शब्दांचे, लहू का आटले होते ?
जळाले काव्य माझे मी व्यथेला छाटले होते.........!!


बुडाला कालचा काळोख, त्याचे भास राहीले
सुने आभास ते ,डोळ्यात माझ्या साठले होते........!!


विकुनी आसवांना, हुंदके गेले उधारीला
असे दुखास बाजारात, आता थाटले होते ...........!!


सुखाची पांगळी मी, आंधळी दुखात जी झाले
परी डोळाभरुनी, यातनांनी गाठले होते..............!!


तरुनी यातना साऱ्या, तळाशी साचले आहे
मुक्या त्या वेदनांनीही, अशी मी बाटले होते .........!!



......कविता


वृत्त :वियदगंगा

पडकी भिंत ...........

Share


पडकी भिंत ........

निरोपाच्या आळवणीचे
सूर कळसात सूर्यास्ताने
खोविले होते .................
राउळावाचून मी गाभाऱ्यात
देवाला जे पाहिले होते

गाभारयातला देव आणि मी .....
जस देवालय तसा देव नी तसा
त्याचा मी भक्त .....
दोघांच्या आता ओट्यात
संधिप्रकाश सांडला होता

भग्न देवालय चिरलेले दरवाजे
मातीकडे झुकून एकटक
पाहणाऱ्या त्या भिंती
दूरवर शीळ घालणारे विरक्त पारवे
सारच दूर दूर एकट राहिलेलं

म्हणूनच आसमंतात
ढगांनी गर्दी केली
कोणाची करमणूक व्हावी ??
म्हणून पावसाने
ढग वाऱ्याचा खेळ मांडला होता
वारा फोफावला विजेचा तडाखा
त्या भिंतीशी झुंजून गेला

देवाच्या आणि माझ्या
खेळात अजून एक
सवंगडी आम्हास मिळाला
खरच देव करुणेचा सागर आहे
पण कोणासाठी ??
त्याच्यासाठी माझ्यासाठी कि
त्या पडक्या भिंतीसाठी ????

खचलेली भिंत
चिखलातून रडत होती
ती फक्त आजच रडणार होती
उद्याच्या रुक्ष उन्हात
तिचा दगड होणार ...
दगडच होणार .......
देवाच्या आणि माझ्या खेळात
ती आमच्यासारखीच दगड होणार

निरोपाच्या आळवणीचे सूर
भीतीने आळविले होते
भिंतीतले कोनाडे
ओल्या चिखलाने लिंपले होते .

ती पडकी भिंत ......
मी आणि तो दगडातला देव
मीच फक्त त्या देवाला पाहिले होते
फक्त मीच ......
उद्या पडकी भिंत पण
त्या दगडातल्या देवाला पाहणार....
हो .....उद्या पाहणार .........


.......कविता

फीतूर (गझल )....

Share

फीतूर (गझल )....


लाजणे फीतूर होते
आरशाला दूर होते .............!!


श्वास ओले पैंजणाचे
बासरीचे सूर होते ..............!!


कंकणी जे स्पंदनी ते
मी मला काहूर होते .............!!


भाळता आभाळ भाळी
चंचला मी चूर होते ..............!!


वाळले डोळ्यात अश्रू
काजळा आतूर होते ..............!!


गाजले ओठात नाही
हारणे मंजूर होते ................!!


अंतरी तुझ्या जळोनी
मी नवा अंकूर होते ..............!!





.....कविता

बंधन (गझल)

Share

बंधन (गझल)

मी एकटाच येथे माझ्या जगात आहे
झाला लिलाव माझा त्या बंधनात आहे

श्वासात वादळाच्या ऐसा जगून आलो
अद्याप शाप त्याचा जो स्पंदनात आहे

पाहून चंद्र आला प्रतिबिंब आठवांचे
तो मालकंस आता का पंचमात आहे

भेटीत मौन तैसे ताजेतवान होते
मी हाय आजही का तव आंदणात आहे

दे तू मलाच झोके प्रेमातले जरासे
वारा पसार व्हावा जो अंतरात आहे

गंधात केवड्याच्या वेणी सुकून गेली
स्पर्शात ती गुलाबी अन चांदरात आहे


....कविता

वृत्त (गझल )

Share

वृत्त (गझल )

मी तुला आता स्मराया लागले
वा स्मशानी वावराया लागले ?

पापणीला भार झाली आसवे
प्राण ओले अन तराया लागले

बंद ओठी राहिले हृदयातले
कोण कोणा सावराया लागले ?

ओळखीच्या फक्त झाल्या त्या चुका
ते म्हणाले मी हराया लागले

पाठ केले मी तुला कित्येकदा
वृत्त माझे काचराया लागले

प्रीत आणिक न्याय दोन्ही आंधळे
पांगळ्याला ते धराया लागले ?

वेदनेचा चेहरा मज बोलला
"मी कुरुपाला वराया लागले"

थेंब शाईचा अताशा ओकते
मी (कविता) विषाने बावराया लागले



....कविता

जिवंत मरण

Share


जिवंत मरण

रोज मध्यरात्री ....गाणाऱ्या कोकिळेचा .....
जीव सुकला होता ....तिच्या कंठात .....फक्त
आक्रोश होता .....बेसुरा किंचाळवाणा .....
तिचा सूर त्याने ......चोरला होता की.....
तिनेच तो विकला होता ????
घरट्यातील आवाजासाठी .....
अन त्या सुराच्या किलाबिलीसाठी .....
पण .............
आता तिच्यासाठी सारच .....उजाड होत ...
तसाही कुरूप असणारा
तिचा काळा रंग .......
तिचा कापलेला आवाज
कदाचित तिचे आपले वाटणारे घरटेही ..........
कारण ........
तिच्या सुराला आक्रंदतेचा परिचय....झाला होता ......
आणि तिला ......
थडग्यावर गीत कोरणाऱ्या.......
....................... त्या जिवंत मरणाशी

......कविता

आकार

Share


आकार

दगडासही येथे 'आकार 'आहे
रे जीवना मी का लाचार आहे .....?

पेटली होळी तेव्हा भावनांची
पुरण नैवेद्यास मी साकार आहे ...

दुःख बुडाले खोल डोळ्यात आता
हाय ! मी अश्रूंचा आधार आहे

खा तू तोडून लचके गरीबांचे
जीव हा जीवाचा आहार आहे ....

मागूनी घे जमाखर्च जखमांचे
छे ! उगा का माझा बाजार आहे ?

देवाधिक सारे ते सांगूनी गेले
"जन्म हे मृत्यूचे आगार आहे "

चिरुनी ओठ शब्द विरुनी गेला
एवढा का व्यथेस आजार आहे ?

तुझ्यावर ना केले प्रेम कधी मी
माझा गून्हा मला साभार आहे ......!!


.....कविता

गझल .......

Share


गझल .......



वितभर त्या ओळीची ओळख घेवून
मी (कविता)ओघळत निघाले ....
प्रवाही दिशेने आवेगाने वाहू लागले
येणाऱ्या प्रत्येक पोकळीत ...
माझे अस्तित्व मी
मी शोधू लागले होते ....

माझी ओळख शोधू लागले
जमिनीत दिसणाऱ्या....
प्रत्येक जखमेच्या गर्तेत .....
तर कधी आनंदाच्या विशाल
सागरातून पोहून आलेल्या ....
उल्कापातेच्या खाचखळग्यात ...
तरी कधी .....
क्रोधाच्या अग्नीतून आवेशाने
आलेल्या धरणी कंपांच्या खड्ड्यात

अखेरीस त्या ओळीचा ....
काही पुसटसा अर्थ घेवून येणाऱ्या
शब्दाशी तिचा परिचय झाला ....
रदीफ काफिया असे काहीसे
पुटपुटत.....ती पुन्हा चालू लागली .....
घाटातल येणार प्रत्येक वळण
वळसा घालून ....
मृत्यूला झुंज देत होत ...
पण तितकंच जगण्याला स्वीकारत होत
पण ती ओळ फक्त बडबडत राहिली ....
रदीफ काफिया .......

प्रत्येक वळणावर ओळखीची नजर
होती फक्त त्या मृत्यूची ....
नाही नाही ...रदीफ काफिया ....
पण त्याच्या प्रत्येक ओळखीवर
मी विजयाचा पताका रोवला होता ....
तो विजय ....
माझ्या भावनेनी खुडलेल्या अश्रुफुलांचा
आणि दगडाची देवमूर्ती झालेल्या शब्दांचा ....
विवश होवून कोसळणाऱ्या माझ्या
भावनांचा .....आणि
वीज होवून कडाडून उठणाऱ्या
मौनस्थ शब्दांचा ......
माझ्या सुखाचा आणि दुखाचा ...
कागदाच्या पानावर दोन रेघोट्या
ओढणारया माझ्या दुबळ्या मनाचा
तो विजय जयजयकार करीत होता
"शेर बराए शेर "

मृत्यूने अजूनही प्रत्येक वळणावर
तितकाच मजबूत तळ ठोकला होता ....
तो मृत्यू त्या प्रत्येक शब्दात ...
साचला होता .....रदीफ काफिया ....
असे कितीतरी काफिया आणि
रदीफ त्या पुढ्यात मांडले होते ...
पण सारेच काफिये माझे न्हवते ...
अखेरीस ते उरलेले काफिये
निरर्थक झाले ....

दैवाने माझ्या वाट्याला
पाठवलेली सारी वळण संपली होती .....
प्रत्येक वळणाशी ....दुसऱ्या वळणाला
विसंगती दाखवेल अशी वळणे
सरून गेली .....माझी गझल
बहुदा पूर्ण झाली असावी
आणि घाटाचा रस्ता उतारू दिशेने
चालू लागला .....

आता तो सरळ सरळ चालणारा
मार्ग देखील माझी ओळख विचारू लागला
मक्त्यावर लिहिण्यासाठी नाव पुसू लागला
पण मी किती निरुत्तर होते ??
अस्तित्वाच्या शोधात काढलेला
माझा प्रवास किती निष्प्रभ होता ...
मी कोण ?

मृत्यू नावाच्या रदीफ काफिया वर
विजय मिळवणारी विजयी ...कि
शब्दांना छंद बद्धत करणारी
त्यांची शिकारी ....कि
माझी सोबती मानणाऱ्या
भावनेची सखी ....कि
कागदावर दोन थेंब
ओघळणाऱ्या शाईतील अश्रू ....कि
लेखणीच्या अग्रभागी असलेला
एक जिव्हाळा .....कि

नुसताच मूर्तिमंत दगड ....
देवत्वाचे अस्तित्व दगडात
चाचपणारी .....कि ....
मक्तयाने जोखमीने वर्षाषुनवर्षे
सांभाळाव अस एक नाव
एक फक्त ....नाम ......
स्वताच गंध रूप नसलेलं
अस्तित्व नसलेलं.... नाम....
कोण मी ?

मक्त्याने तर ते निर्जीव नाम
आता धारणही केले होते .....
पण माझी गझल .....शीर्षक ...मागत होती ...
स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याकरिता
मार्गक्रमण करणाऱ्या गझलेला
शीर्षकच न्हवत ....
मागे टाकलेल्या मिणमिणत्या प्रकाशाला
आणि पुढ्यात आलेल्या अंधाराला
उचलून धरणारे मन
विचारात गुरफटून गेले
माझ्या गझलेचा शीर्षक काय
गझल हसून खिदळली आणि बोलली
"आयुष्य ..........."


......कविता

पोरका ....

Share


पोरका ....


मलाच आता मी पोरका वाटून गेलो
तुझ्या प्रेमास तिलांजली देवून गेलो ||धृ||


पिसूनी पिसूनी तुझी गोड स्वप्ने सारी
का ? तुझ्याशी जुगार खेळला विषारी
तुझा तुझाच गुन्हेगार मी होवून गेलो ||१||
...................मलाच आता मी पोरका वाटून गेलो


तुझे प्रेम तुझे प्रेम मी हेटाळले होते
मिजाशीचे सारेच वायदे पाळले होते
तुझ्या सुखातही दलाल होवून गेलो ||२||
...................मलाच आता मी पोरका वाटून गेलो


तुझ्यावाचून तुझ्यावाचून चालतो मी
उन्हात माझ्या सावलीस जाळतो मी
उधळून राख माझी रीता होवून गेलो ||३||
...................मलाच आता मी पोरका वाटून गेलो


दूर दूर तू जाताना माझा तुरुंग झाला
कसा होवू मुक्त आयुष्याचा सुरुंग झाला
विरहात तुझ्या उजाड मी होवून गेलो ||४||
...................मलाच आता मी पोरका वाटून गेलो


माफी आता तुझी कशी ग मागू राणी
फाटक्या झोळीत देशील का तू नाणी
तुझ्यापुढे आज नेणता मी होवून गेलो ||५||
...................मलाच आता मी पोरका वाटून गेलो




.....कविता

अद्वैत

Share


अद्वैत

सारवूनी क्षितिजाचे अंगण
चंद्रज्योत ललाटी घेवून ये
तुडवीत तिमिर पंकातला
तेजाचे अमृतकुंभ घेवून ये

भरले डोळे आज दवबिंदुनी
पापणीचे धुके तू सारून ये
आंदळून झोका वाऱ्यातला
सौरभ प्रकाशाचा माळून ये

टाकीत पावले नभमंदिरात
किरणांचे राऊळ लेवून ये
निर्जीव देह निर्मळून माझा
सजीवत्व फुलांचे घेवून ये

उधळीत चौखूर तव रथाचे
आधार जीवनाचा होवून ये
सिंचुनी केशकेसरी कवडसे
प्रीतीत माझ्या न्हाहून ये

तुझ्या दर्शने ......
हृदयस्थ जाहले आकाश सारे
अंशअंशाने तेजाने सजुनी गेले
तूच तूच मी अन मीच मीच तू
आत्म्यातून अद्वैत होवुनी गेले


.....कविता

गुरुवार, २१ जुलै, २०११

गुगलला मराठीचे वावडे का ?

Share


गुगलला मराठीचे वावडे का ?

भरत गोठोसकर, बुधवार, २० जुलै २०११

लोकसत्ता
--
गुगलने मराठी भाषेला वळचणीला टाकल्यामुळे ही भाषा व मराठी लोक यांच्यावर अन्याय झाला आहे. पण दुर्दैवाने मराठी लोकांचे व राज्य सरकारचे त्याकडे अजून लक्ष गेलेले नाही. खरे म्हणजे 'गुगलला मराठीचे वावडे' हा विषय मराठी लोकांनी तातडीने व गांभीर्याने विचारात घेणे आवश्यक झाले आहे.
आता गुगल जगातील बारावी सर्वात मोठी कंपनी झाली आहे. कंपनीच्या शेअर भांडवलाचे तिच्या शेअरच्या बाजारभावानुसार एकूण मूल्य म्हणजे मार्केट कॅपिटलायजेशन होय. त्यानुसार भारतात रिलायन्स इंडस्ट्रीज ही सर्वात मोठी कंपनी आहे. या मोजपट्टीप्रमाणे गुगलचा आकार रिलायन्सच्या तिप्पट ठरतो. मूळ धंदा स्थिरस्थावर झाल्यावर गुगलने आणखी शोध लावून नवीन सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच माहिती तंत्रविज्ञानातील काही कंपन्या विकत घेतल्या. त्यायोगे गुगलकडून कित्येक सेवा पुरवल्या जातात त्या अशा - ई-मेल (जी-मेल), सोशल नेटवìकग (ऑर्कुट व गुगल प्लस), स्ट्रीमिंग व्हिडीयो (यू टय़ूब), न्यूज अ‍ॅग्रीगेटर (गुगल न्यूज), नकाशे (गुगल मॅप्स), फोटो शेअरिंग (पिकासा), ऑनलाईन पुस्तके (गुगल बुक्स), इंटरनेट ब्रावसर (क्रोम), ब्लॉिगग साईट (ब्लॉगर) इत्यादी. सध्या जगात रोज गुगलच्या सेवांचा लाभ घेण्याचे किमान एक अब्ज प्रयत्न होतात. म्हणजे गुगल हे जगातील पहिल्या क्रमांकाचे संकेतस्थळ (वेबसाईट) आहे. आता भविष्यकाळात आणखी प्रगत तंत्रविज्ञान साध्य करून ते लोकांना उपलब्ध करून देण्याचा गुगल प्रयत्न करीत आहे. क्लाऊड कॉम्पुटिंग हा त्यापकी एक नवा विषय आहे. या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि अ‍ॅपल या दुसऱ्या कंपन्याही स्पध्रेत आहेत. यामुळे येत्या काही दशकांत जगातील सर्व लोकांचे जीवनच बदलून जाणार आहे. यास्तव याकडे सरकारे, संस्था किंवा व्यक्ती यांनी दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही.
गुगलची द्रुतगतीने वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या संकेतस्थळाचा वापर केला पाहिजे हे तिने प्रारंभीच जाणले. या संबंधात मुख्य अडचण भाषेची होती. तोपर्यंत फक्त इंग्रजीतून गुगलची सेवा उपलब्ध होती. मग ज्या भाषा इंग्रजीप्रमाणे रोमन लिपी वापरतात (उदा. फ्रेंच, जर्मन वगरे) त्या भाषिकांसाठी गुगलने आपली सेवा उपलब्ध केली. पुढे चिनी व अरबी भाषांमध्ये ही सेवा चालू झाली. लोकांना त्यांच्या भाषेच्या लिपीत टाइप करण्याकरिता 'गुगल ट्रान्सलिटरेट' ही सेवा सुरू केली. म्हणजे रोमन लिपीत "maharashtra" टाइप केलं तर त्याचे देवनागरी लिपीत 'महाराष्ट्र' असे रूपांतर होते. या सेवेमुळे भारतातील लोकांचा त्यांच्या मातृभाषेत इंटरनेटवरचा वापर खूप पटींनी वाढला. याचा पुढचा टप्पा म्हणजे 'गुगल ट्रान्सलेट' म्हणजे भाषांतर सेवा. या सेवेने जर आपण
"How are you?" हे टाइप केले तर ते जर्मनमध्ये "Wie geht es Ihnen?" म्हणून भाषांतरित होते! फक्त शब्द आणि वाक्य नाही तर चक्क परिच्छेदही भाषांतरित करता येतात. याचा अर्थ असा की, वेळ आणि पसे खर्च न करता आपण दुसऱ्या भाषेतील संकेतस्थळे, पुस्तके व लेख वाचू शकतो. भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!
गुगलने आपल्या भाषांतर सेवेमध्ये मराठी समाविष्ट केली पाहिजे यासाठी तिचे महत्त्व काय आहे ते प्रथम पाहू -
* भारतात जास्तीत जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी व बंगाली यांच्यानंतर मराठी व तेलुगू तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तमिळ, कन्नड किंवा गुजराती या भाषिकांपेक्षा मराठी लोक अधिक आहेत. खरे म्हणजे जगात मराठी बोलणाऱ्यांची संख्या गुजराती भाषिकांच्या जवळजवळ दुप्पट आहे.
* गुगलची भाषांतर सेवा ६४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. जगात मराठी भाषिक संख्येने पंधराव्या स्थानावर आहेत. याचा अर्थ मराठीहून संख्येने कमी असलेल्या ५० भाषांना या सेवेचा लाभ मिळतो. फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत.
* राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या भाषा आहेत. मुळात त्या १४ होत्या. आता त्यांची संख्या वाढून २२ झाली आहे. त्या परिशिष्टात अगदी पहिल्यापासून मराठी समाविष्ट आहे.
* भारतात महाराष्ट्र हे लोकवस्तीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून येथे मराठी ही कायद्याने राजभाषा आहे. तसेच गोवा, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव येथे द्वितीय क्रमांकाची राजभाषा आहे. इस्रायल व मॉरिशस या राष्ट्रांमध्ये मराठीला मानाचे स्थान आहे.
* बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक व गुजरात याहून महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे.
* भारतात सर्वाधिक ब्रॉडबँड इंटरनेट व मोबाईलचे उपभोक्ते महाराष्ट्रात आहेत.
* इंडिअन रीडरशिप सव्‍‌र्हे या संस्थेनुसार भारतात वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत हिंदीनंतर मराठी वाचकांचा क्रम लागतो. त्यानंतर मल्याळी व इंग्रजी वाचकांची संख्या आहे. मराठी भाषेत आता १० दूरदर्शन वाहिन्या सक्रिय आहेत.
* सॉफ्टवेअर क्षेत्रात मराठी माणसाचे प्राबल्य आहे.
* लाखो मराठी लोक परदेशामध्ये स्थायिक झालेले आहेत. अमेरिका, युरोप, पश्चिम आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आदी ठिकाणी ते स्थिरावले आहेत. मराठीची जोपासना करण्यासाठी त्यांनी तेथे संस्था स्थापन केल्या आहेत. मॉरिशसमध्ये मराठी प्रेमवर्धक मंडळी ही १९०२ साली तर लंडनचे मराठी मंडळ १९३२ साली अस्तित्वात आले.
* इंडोआर्यन भाषांमध्ये मराठीचे साहित्य हे सर्वात जुने म्हणजे दहाव्या शतकापासूनचे आहे. खरे म्हणजे मराठीचा पहिला वापर आठव्या शतकात आढळतो.
* आधुनिक भारतीय रंगभूमीची स्थापना विष्णुदास भावे यांच्या 'सीतास्वयंवर' या मराठी नाटकाने १८४२ साली झाली असे मानले जाते.
* बायबलची मराठी आवृत्ती १८११ साली विल्यम कॅरी यानी प्रसिद्ध केली तर 'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र १८३५ साली बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले.
* भारतात मुलींची पहिली शाळा जोतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी सुरू केली. तिचे माध्यम मराठी होते.
* अमेरिकेने १९७७ साली अवकाशाच्या बाहेरच्या कक्षेत वॉयेजर नावाचे अंतराळयान पाठविले. तेथे कोणी माणसे असतील तर त्यांच्यासाठी त्यामध्ये विविध भाषांमध्ये शुभसंदेश होते. त्यातला मराठीतला संदेश होता - ''नमस्कार. या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही या जन्मी धन्य व्हा.''
* महाराष्ट्रात सर्व विद्यापीठांमध्ये मराठीचे अध्यापन होतेच. याशिवाय या राज्याच्या बाहेरील विद्यापीठांमध्ये म्हणजे महाराजा सयाजीराव (गुजरात), बनारस हिंदू (उत्तर प्रदेश), उस्मानिया (आंध्र प्रदेश), गुलबर्गा व कर्नाटक (कर्नाटक), देवी अहिल्या (मध्य प्रदेश) आणि गोवा या विद्यापीठांमध्ये मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे.
हैतीची क्रिओल, अजरबजानी, माल्टीज आणि कॅटलॅन वगरे नगण्य भाषिकांसाठी जर गुगलची ही सेवा उपलब्ध आहे, तर मग थोर वारसा असलेल्या मराठी भाषेला का नसावी? गुगल न्यूज गेली कित्येक वर्षे हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळी भाषांमध्ये उपलब्ध आहे, पण मराठीत नाही. जर ही मूलभूत सेवा अजून मराठी माणूस वापरू शकत नाही तर मराठी भाषांतर चालू करायला गुगल किती वेळ घेईल हे देवच जाणे! भाषा समृद्ध होण्यासाठी आणि तिचा वाढविस्तार होण्याकरिता या २१व्या शतकात तंत्रविज्ञानाचीही कास धरली पाहिजे. जर गुगल ट्रान्सलेटमध्ये मराठी समाविष्ट झाली नाही तर या भाषेची मोठी हानी होईल. मराठी साहित्य, इतिहास, विचारधन व पत्रकारिता यांच्याशी बाकीच्या जगाचा संपर्क गुगलविना सहजपणे होऊ शकणार नाही. ही सेवा उपलब्ध झाली तर स्वयंशिक्षणला, विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रातील या शिक्षणपद्धतीला फार मोठा हातभार लागेल.
आता प्रश्न असा पडतो की, गुगलने मराठीला वळचणीला का टाकले? बहुतेक सर्व मराठी लोकांना हिंदी अवगत असल्यामुळे त्यांची भाषा घेण्याचे आपणाला कारण नाही असे त्या कंपनीला वाटले असावे किंवा भोजपुरी, ब्रजभाषा, मारवाडी आदी देवनागरी लिपीतील हिंदी पोटभाषांप्रमाणे मराठी एक असावी असा गरसमज झाला असेल. कदाचित लिंगभेदाच्या अडचणीमुळे मराठी ही भाषांतराकरिता कठीण पडत असेल. T.A.N.A. (तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका) सारख्या संस्था अशा विषयात फार आग्रही असल्यामुळे तेलुगूचा हक्क कोणी डावलू शकत नाही, पण जगभरातील १०० हून अधिक 'महाराष्ट्र मंडळे' काय करत आहेत? भारतातील अन्य भाषिकांपेक्षा मराठी लोक फार सहिष्णू आहेत हे जाणून गुगलने हे दुर्लक्ष तर केले नाही ना? या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांमध्ये मराठी लोक चांगल्या संख्येने आहेत, पण त्यांनी 'मराठी बाणा' दाखवलेला दिसत नाही.
गुगलने केलेला हा अन्याय दूर करण्यासाठी मराठी लोकांनी कसलीही चळवळ करण्याची गरज नाही. मग महाराष्ट्र सरकार काही करणार का? या राज्याला आतापर्यंत जे १५ मुख्यमंत्री लाभले त्यापकी सध्याचे पृथ्वीराज चव्हाण हे तंत्रविज्ञानाचे शिक्षण घेतलेले एकमेव होत. या विषयाची अत्युच्च पदवी त्यांनी अमेरिकेतून घेतली आहे. गुगल वि. मराठी हा विषय त्यांना चांगलाच ठाऊक आहे, पण त्यांच्यावर कामाचे ओझे एवढे अतिप्रचंड आहे की, गुगलला एक पत्र लिहिण्यासाठीसुद्धा त्यांना फुरसद नाही, पण प्रत्येक प्रश्न सरकारने सोडविला पाहिजे, असा आग्रह का? सुदैवाने या समस्येवर साधा व सोपा उपाय आहे. तो म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने www.petitiononline.com/gmarathi येथे सही करून आपली नाराजी गुगलचे प्रमुख लॅरी पेज यांच्याकडे व्यक्त करावी.


धन्यवाद !




__._,_.___

माणसांची सर्दी

Share


माणसांची सर्दी


मला माणसांची सर्दी आहे
....शिंका येतात ....मला ...
माणसांची गर्दी पहिली की...
मग धरते मी रुमाल ...तलम मऊ
...माझ नाक पुसायला ??
छे छे काहीतरीच ...तुमच ....
तुम्हाला नको व्हायला त्रास
....या सर्दीचा ...हो म्हणूनच ...
नाक चोंदत आहे माझ....
श्वास कोडंत आहे माझा ....
....या गर्दीमुळे ....या गर्दीमुळे ...
बघ्यांची गर्दी ...नुसती ....
जा ना आता .....
काय पाहताय सगळे ...बघे नुसते ...
सांगितलं न मी .....
.
.
.
.
.
मला माणसांची सर्दी आहे
....शिंका येतात ....मला ...
माणसांची गर्दी पहिली की...


...कविता

तुझ्याशिवाय

Share

तुझ्याशिवाय

आभाळ जेव्हा भरून येत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ......
तुझ्या आठवणींची

पान पान शहारून येत
तेव्हा दवबिंदूने लाजायचं नसत
मरण कुशीत येईल आता
म्हणून पानाने ओसरायच नसत
तेव्हा पहायची फक्त वाट
आसवाने डोळ्यांची आणि
अर्ध्या जागलेल्या स्वप्नाने
तुझ्या आभासांची

होईल वाऱ्याची ओळख
तेव्हा फुलाने दरवळायच असत
अस असत दुख म्हणून
गंधाने वेदनेला टिपायच नसत
तेव्हा मात्र कराययचाच फक्त घात
विव्हळणार्या चांदण्यांनी
क्षय झालेल्या पौर्णिमेचा आणि
अस्तीवाहीन वाऱ्याच्या ओळखीने
तुझ्या जाणीवेचा

पसरतील हात अंगणाचे जेव्हा
तेव्हा करायची अंधाराची मुठ
काळोखाला नसतेच जाग
उजेडातल्या सावल्यांची म्हणून
क्षीतीजाने काजळायाच नसत
त्याने जाळायची वात
सूर्याच्या विभोर स्पर्शाची आणि
काळ्याभोर शाईने तुझ्या कवितांची
बस्स इतकंच मग झाल
आणखीन काय ???
तुझ्याशिवाय इतक बास आहे मला


.....कविता

भावना (गझल )

Share

भावना (गझल )


लिंपले भिंतीस होते दार मी
घेतली नाही कधी माघार मी

बांधले दुःखास पायी नाचण्या
पैंजणाचे मानले आभार मी

(पाकळ्या होत्या गुलाब मिठीतल्या)
ज्यास रक्ताची म्हणाले धार मी

जाग स्वातंत्र्यास नाही आजही
छेडली प्रीतीत होती तार मी

अंत विश्वाचा पहावा मी कसा ?
ब्रम्हरूपी आदि जो ओंकार मी

चांगले वाईट सारे जाहले
कोणता शोधू नवा आधार मी ?

का ?तुझ्यावाचून आल्या भावना
काळजावाचून झाले ठार मी

कविता

अर्थ वेदनेचा

Share

अर्थ वेदनेचा



असा आधार होता तसा व्यवहार होता
बोचला जिव्हारी थेट तुझाच वार होता

अर्थ माझ्या वेदनेचा नका लावू कुणी
संपलो शेवटी म्हणून फक्त अंधार होता

मरणा तुला सुळेवरती चढवुन आलो
इथे भलताच तुझा जयजयकार होता

हक्क तुझा का मागतो क्षणाक्षणाला
अरे जीवना जो तो तुला तय्यार होता

घे राख स्वप्नांची दे आग आठवांची
आपल्यातला संपला ग करार होता

इथेच आता मी थांबतो आहे जरासा
जिंकण्यासाठी का कधी जुगार होता

थकली पावले उदास एकटी पायवाट
अश्रुस डोळ्यांचा वाटला भार होता

रंग मावळतीचे आले अंगणी माझ्या
तुझ्या आभाळी चालला शृंगार होता

तुझ्यावाचून आज जाणले मी मला
हुंदका माझा अन परका हुंकार होता

मंगळवार, १९ जुलै, २०११

कुठे हलकीच सर------!!

Share

 कुठे हलकीच सर तुझे दूर घर
घे घे सखे जपून थोडासा पदर
डोंगर मेघाचे डवरते तुझ्यात
थेंबथेंब पावसास लागे निवांत

चिंब चिंब पान झुलवते रान
शहारयास आले अलगद भान
थर थर पापणी भुवई कमान
झुकले अंबर क्षितीज उधाण

कशी झरे माती आभाळ नाती
अंग अंग झाली गवताची पाती
निळाईत तुझ्या तूच वेल्हाळ
हुळहुळ पैंजणात श्रावणमाळ

गार गार वाऱ्यावर येते लहर
कधी कुठे गुंजारव करती भ्रमर ?
टप टप टपोरा नदीस ग भर
तुझ्या काळीजात कोण मनभर ?

गर्द गर्द घनात मिटले आभाळ
काळ्याभोर वनात पावले दुधाळ
भेट भेट तुझी सारतो दूर क्षण
जन्म घेते नव्याने तुझ्यात मन

नकोनको इतक्यात नकोच जाऊस
खेळु दोघे जरासा पाऊस पाऊस
कशीकशी आभाळाने बदलली कूस
तुझ्या गावी अजून पडतो पाऊस

ओंजळ

Share

भरल्या हातात
फुलाची ओंजळ
सुखाचे पैलतीर
दरवळ दरवळ

धाव घेई वारा
गंधीत चाहूल
पाकळी वेगळे
पाऊल पाऊल

गुंफला बोटात
आयुष्य शेला
यात्रेत तुझ्या
सरला सरला

भरली परडी
सांडले फुल
गहिवर मन
अबोल अबोल

मातीस नाही
दिशेचा अंत
मृत्यूकथा ही
जिवंत जिवंत

रिती ओंजळ
रिताच सुगंध
तुझा माझा
अतूटसा बंध

सांज संध्या

Share

पानात लपला ग सूर्य कोवळा
उजळला चंद्र भाबडा भाबडा
परसुदारी कोण ग आली बाई
सायंकाळी आरवतो कोंबडा

ये ग ये ग माझी माय माऊली
नेसवू तुला कोणती सावली ?
रंगउधळण माझ्या अंगणदारी
बिलवर पाटल्या सोनसोनेरी

अशी कशी आज आलीस माय
थबकला माझा उन्हात पाय
लोळते सुख माझ्या संसारात
दुख धाकटे होते आभाळात

पती आहे माझा ग लेकुरवाळा
लावतो मेघाचे भस्म कपाळा
बैसला ध्यानस्थ लेवून शेला
शिरी त्याच्याच रवी लोपला

उंबर्यात माझ्या ग नक्षत्रथवा
चिवचिव पाखरे रोज खेळ नवा
हळूच भुरकन उडते आकाश
तुझी आठवण येते सावकाश

नको करू काळजी जा तू माय
दुधावरी करपून जाईल साय
संध्या सरली झाली ग रात्र
संधिप्रकाश अजून आहे मात्र

पाणी उन उन ......!!

Share

भर डोळ्यात पाणी उन उन


भर डोळ्यात पाणी उन उन
वेदनेस लागली केवढी तहान
काळीज तुझे अजून कठीण
तरी मनी राहते कोण जपून

भर डोळ्यात पाणी उन उन
धागे पापणीचे जे झाले जून
कसे झाड तग राहते धरून
ओस धरतीत आभाळावाचून

भर डोळ्यात पाणी उन उन
कापरे हुंदके ठेव तू राखून
मागते नदीस अखंड हे दान
सागराचे सागरी दे उधाण

भर डोळ्यात पाणी उन उन
सामावल्या जखमा उरे खुण
नाही राहत काही सारेच लपून
सूर्य अंधारातही जळतो अजून

भर डोळ्यात पाणी उन उन
त्यागाचे स्वरूप एकदा धरून
जाणून घे आपलेच तू मन
माफ कर त्यास धीर धरून

भर डोळ्यात पाणी उन उन
झाले गेले आता जा विसरून
सुखाचे दुखाशी होईल मिलन
मांडवाखालून अश्रू ये ओघळून


भर डोळ्यात पाणी उन उन
भर डोळ्यात पाणी उन उन

लाटणे पुराण

Share

लाटण्याने मारताना घ्यावी कोणती काळजी
सांगते सख्यांनो आज गोष्ट तुम्हा ताजी ताजी

लाटण्याने मारताना फक्त मारावेच त्याला
तदनंतर कराव्या लाटून भाजून पोळ्या

लाटण्याने मारताना नसावी इतकी घाई
बाजारात धाडुनीया द्यावी आधी सासूबाई

लाटण्याने मारताना मारूच नये फेकून
चुकून तो पकडेल झेल त्याचाच झेलून

लाटण्याने मारताना पोळपाट न्या जपून
नाहीतर नवरोबा त्याने मारेल चुकून

लाटण्याने मारताना अचूक असावा नेम
घ्या मलिंगाचेच नाम सारेच होईल क्षेम

लाटण्याने मारताना आधीच घ्यावी कबुली
नेवून आण हॉटेली नकोत चणे काबुली

लाटण्याने मारताना मध्येच घ्यावा आराम
सांगा त्यासी पाणी आण भरला रे मला दम

लाटण्याने मारताना करेल तो लाडीगोडी
मागावी लगेच तेव्हा बनारसी शालू जोडी

लाटण्याने मारताना जी हे करे स्त्रोत्रपठण
अधिका अधिक तिज येईल शक्ती अजून

(फलश्रुती )
अधिक काय सांगावे सख्यानो तुम्हा अजून
लाटण्याने मारताना प्रेमही ठेवा जपून

जगणे मरणे तुझ्यात

Share

होते नभात चांदणे टिपूर
मनात होते गाण्याचे सूर
दिलीस मला हळूच हाक
जळात आले तरंग लाख

मागणेही तुझे तेच तेच
लाजणेही माझे तेच तेच
ओठावरी अमृत संस्कार
ओठावाचून जरी उच्चार

कुठे शेवट कुठे किनारा
मोर फुलवितो पिसारा
धडधडते जरी उर आत
इंद्रधनुष्यात रंग सात

फिरून वेदानांना अंती
जगणे मरणे तुझ्यात
उरले होते सूर मागे
विरले चांदणे नभात

जन्मभर....(तरही गझल)

Share

खोल खोल आतवर तुझी नजर
गुंतले जिच्यात मी निमीषभर

आर्जवे खट्याळ पाहण्यातली
का करी अजाणता मनात घर ?

थोपवू नको विजेस वादळा
हाय! मी उभी जळेन फ़ारतर

नेमकाच प्रश्न टाळलास तू
बोललो जरी बरेच आजवर

शांतता टिकेल का घरी सख्या,
संशयास मानशील मित्र जर

निर्विवाद लाव सोक्षमोक्ष तू
धिंड काढ वाटल्यास ’दर-बदर’

राहिले अखेर ओळखायचे
काढता उणी-दुणीच जन्मभर

कशाला???......(गझल).

Share

सख्या सांजवेळी उसासे कशाला,
दिवेलागणीला दिलासे कशाला?

...सदासर्वदा स्पंदनांच्या धुमाळी....
तुझा शोध घेण्या नकाशे कशाला?

मनाच्या तळाशी तुला कोंडले मी...
अता दार, भिंती नि वासे कशाला?

क्षितीजास गाठावया सोबतीने...
उभा जन्म चालू, जरासे कशाला?

उराच्या मुळाशी खरा रोग जडता...
उगा वैद्य-नाडी-तपासे कशाला?

नको नाव शोधू ’प्रिया’ बंधनाचे....
मनोमीलनाचे खुलासे कशाला?

तरीही......(गझल).

Share

जरी संपले श्वास सारे तरीही
नवे वाहती रोज वारे तरीही


किती लिंपले काळजाच्या तड्य़ाला
मनाची निखळतीच दारे तरीही


उभा जन्म झेलीत दु:खे सरावा
सुखाचे निसटतात पारे तरीही


मना शॄंखला जाचणा-या रितींच्या
जुळो ’सूर’ ना, गीत गारे तरीही


मिळो वंचना वा मिळावी उपेक्षा
अहोरात्र तू वाह भारे तरीही


सुन्या अंगणी घोर अंधार दाटे
नभी शोभती चंद्र-तारे तरीही


इथे रोज वेदी-बळी स्त्रीच चढते
कुणी चालल्या देत नारे तरीही

भिंती !!....(गझल)

Share

उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती !!

परजून आठवांना....
करतात वार भिंती !!

आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती !!

गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती !!

सोसून पावसाळे...
पडती न 'गार' भिंती !!

पाहून आसवांना...
द्रवती न ’यार’ भिंती !!

ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती !!

भास होते !!...(गझल)

Share

जरी खास होते, गळा फ़ास होते,
मॄगजळी अयुष्या, तुझे भास होते !!


नको ओढ लावू सख्या मिलनाची...
उसासे उश्याचे मला रास होते !!


उभा जन्म माझा तुला वाहिलेला...
तुझ्या वागण्याचे विपर्यास होते !!


तळपत्या रवीचे नको दाखले हे...
ग्रहण आज सौख्यास खग्रास होते !!


जरा चाखुदे सौख्य मरणातले या...
बहाणे जिण्याचे खरा त्रास होते !!


उठाठेव नसती कशाला ’प्रिया’ ही...
तुझ्या मालकीचे किती श्वास होते ?

सोसला घाटा किती !!(तरही गझल).

Share

आयुष्यसागर खोल अन् नियती तुझ्या लाटा किती....
प्रारब्ध येते आडवे या संकटा छाटा किती !!


मी टाळले कित्येकदा, दु:खे सदाची सोबती...
ज्या आडवू पहाते सुखा, फ़ुटती तया वाटा किती !!


कोरी हिशोबांची वही ना चाळणे वरचेवरी ....
होते किती, उरले किती, अन सोसला घाटा किती !!


अंजारले गोंजारले माझ्या-तुझ्या नात्या जरी...
जा आठवांनो दूर जा! येतो उभा काटा किती !!


ना या मनाचा ठाव रे, मोकाटश्या ढोरापरी ....
बघ परतुनी येते पिका, मारा किती, दाटा किती !!


मी झुंजले, मी संपले, बघ चालले सरणावरी....
दो-चार दिन जे राहिले त्या फ़ोडणे फ़ाटा किती !!

’कर्मज्ञ’......(तरही गझल).

Share

अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली..
आयुष्य हे ’शीळेपरी’ वर्षानुवर्षे लोटली !!


ना मी तुला कळले कधी, जुळली नसावी तारही....
जी आरतीची धून ती, तू लावणीशी तोलली !!


मी आजही उरले तिथे(च)! जेथे मला तू भेटला...
माझ्या उशाशी हाय तू! ही सोडचिठ्ठी सोडली !!


’जातोस जा, येतोस ये !’... वा-या कुणी संभाळले?
लोटून दरवाजा पुढे मी ’तावदाने’ ओढली !!


चढता ठरो वा उतरता आलेख नात्याचा खरा...
रेषा समांतर छाटली, ती छेदणारी कोठली ?


कित्ती उगाळा कोळसा ना गंधणे सहाणेवरी....
आरंभला ’कर्मज्ञ’ अन.. कर्तव्य-पूजा पोचली !!

'पेला' अर्धा भरला.... अर्धा रिकामा होता !!(गझल)

Share

जगण्याचा अट्टाहास मोठा दिवाणा होता...
'पेला' अर्धा भरला.... अर्धा रिकामा होता !!


काय देवू उत्तरे, तुझ्या गुलाबी पत्रांची...
’सिल-बंद’ आयुष्य हे.... कोरा लिफ़ाफ़ा होता !!


नितीमुल्ये कधीची बासणात बांधलेली...
मुखवट्यांच्या राज्यात...सारा दिखावा होता !!


दाही दिशा भरकटे, अस्थिर मनाचा तांडा ...
प्राजक्त आठवांचा....थोडा विसावा होता !!


स्वर्गातच बांधतात म्हणे गाठी लग्नाच्या...
पदरी पडला माझ्या...जळता निखारा होता !!


वारसा हक्कच जणू! ’राजपद’ श्रीमंतांचे....
कायदा मात्र येथे....गरीब बिचारा होता !!


भिक नको मागू ’प्रिया’ ख-या न्याय-निवाड्याची...
केल्या पाप-पुण्यांचा...’वरती’ लिखावा होता !!

हात माझे तंग होते !!(गझल)

Share

हात माझे तंग होते !!(गझल)
*

फ़ुरसदीने तासलेले मरमरी मी अंग होते !
भोगण्याची भोगवस्तू!.....दो घडीचा संग होते !!

*

झुंबराच्या सप्तरंगी कवडश्यांवर भाळलेली...
गंजल्याने जो उडाला..तो कड्यांचा रंग होते !!

*

मैफ़िली जल्लोष होता, रात्र होती धुंदलेली....
मारताना येरझा-या, झिंगणारे दंग होते !!

*

नाव मोठे काम खोटे, माजलेले हे पुढारी...
पांढ-या झब्ब्यात त्यांचे झाकलेले व्यंग होते !!

*

आंधळीशी ज्ञायसंस्था...तोलते सत्यास येथे,
ना पुरावा! कायद्याची हारलेली जंग होते !!

*

पाश छोट्याशा मिठीचा, घट्ट होता..... सोडवेना!
जीवनाची ओढ नाही, हात माझे तंग होते !!

*

तुझा दोष नाही !!!

Share

तुझ्यासारखे बघ, मलाही सुखाने जगाया न आले, तुझा दोष नाही !
तुझी होत होता, कधीही सख्या मग कुणाची न झाले, तुझा दोष नाही !!

पहाटे पहाटे धुके दाटलेल्या सराईत वाटेवरी चालताना....
उरी ठेचकाळून, त्या वेदनेने उभीशी जळाले, तुझा दोष नाही !!

सुखा गोंजराया दहाही दिशांनी लवूनी हजेरी इथे लावलेली,
खड्या संकटांनी, सगे-सोयरेही निमीषी पळाले, तुझा दोष नाही !!

वसंतातल्या कोकिळेची मलाही, कितीदातरी साद घालून झाली,
तुझ्या आठवांच्या, सुगंधी क्षणांच्या ऋतूंनी नहाले, तुझा दोष नाही !!

तुझ्या मागुती चालले रे मुक्याने, नि म्हणशील त्याला मी 'मम' म्हणाले,
तुझे वागणे अन तुझे ते बहाणे, मला ना कळाले तुझा दोष नाही !!

तुझा दोष नाही !!

Share

जरी कुंकवाचीच अंतीम कक्षा, तुझा दोष नाही !
गळा पोत काळी रुळे... हीच शिक्षा, तुझा दोष नाही !!

कुणी बोट दावी, कुणी बोलुनी होय नामानिराळा,
(तुझ्या पावित्र्याचीच अग्नीपरिक्षा, तुझा दोष नाही !!)

कुठे बाळ-श्रावण? कधी सर्प जागे पिलेल्या दुधाला?
तुझ्या पाझराचा सदा भार वक्षा, तुझा दोष नाही !!

क्षणी पाठ दावी तुला पाठचाही, कुणी ना कुणाचा... ,
तुझी ना करे "दोर कच्चाच” रक्षा, तुझा दोष नाही !!

भल्या कोण वाली ? इथे दुर्गुणांची घडे नित्य अर्चा,
तुझ्या सदगुणांचीच परखड समिक्षा, तुझा दोष नाही !!

छंद....(गझल)

Share

*

खरा कायद्याने मला फास होता !
अबोला क्षणाचा, जणू मास होता !!

*

उशाला नहाली तुझी सोडचिठ्ठी,
तुझ्या कुंतलांचा जिला वास होता !!

*

पहाटे पहाटे उन्हे शोध घेती,
सुन्या उंब-याला तुझा भास होता !!

*

जरा हालली सावली ही कुणाची ?
तुझी मुर्त की, फ़क्त आभास होता !!

*

सखे ऐक ना हाक या अंतरीची,
इथे गुंतलेला तुझा श्वास होता !!

*

कळालेच नाही कधी हारलो मी,
तुझा छंद हा ही, तसा खास होता !!

व्यर्थ जगणे !

Share

व्यर्थ जगणे!... जोडण्याला पुण्य काही, पाप काही !
श्राध्द माझे घातले मी ठेवला ना व्याप काही !!

कोण माझे, कोण वैरी जाणते ना कैकवेळा....
केवड्याच्या सोबतीला भृंग काही साप काही !!

'कर्म केले... सोडले ते ’, ज्ञात गीता सार सा-या,
गोड मी मानून घेते पूर्वजांचे शाप काही !!

काय देवू जाब त्याचे, जे न मी केलेत गुन्हे,
ऐनवेळी ठोकते मग आठवे ती थाप काही !!

भोगलेले मांडते रक्ताळलेल्या लेखणीने....
सांडले भाळावरी जे प्राक्तनाचे माप काही !!

ये असा मरणा समोरी, मानली मी हार नाही,
उंबरा ओलांडण्याची ना सुखाची टाप काही !!

मी उरावे ना उरावे, शब्द व्हावे अमृताचे
गौणतेला अर्थ यावा, ध्यास ना अदयाप काही !!

मी एक गझल वेडी........

Share

.....राखते तोल मी !!!......(गझल).
.
*
(गागालगा गालगा गागालगा गालगा)

*

जे पाहते - जाणते ते बोलते बोल मी,
गुंत्यात का भावनेच्या गुंतते खोल मी ?

*

कोणी - कसेही - कुठेही बोलते - वागते,
माझ्याच ना आसवांचे जाणते मोल मी !

*

तालावरी ढोलकीच्या नाचली पैंजणे ,
वॄंदावनी मंजिरीत्या वाटते फ़ोल मी !

*

गंधाळुनी रात हिंदोळी सुखाच्या झुले ,
मीठीतही साजणाच्या राखते तोल मी !

*

साराच हा खेळ मिथ्थ्या , येर-झा-या ठरे
पृथ्वीपरी भोवताली का फ़िरे गोल मी ?

आज पुन्हा तेच घडल

Share

आज पुन्हा तेच घडल
एका धमाक्यान सार शहर हादरल
.
.
किती सहन करायचं.....?
का सहन करायचं....?
कस सहन करायचं....?
.
.
कोण आहे याला जबाबदार
कोण आहे आपल्यातच गद्दार
.
.
काय म्हणता येईल याला
जनतेची अगतिकता.....?
पोलिसांचा निष्काळजीपणा ....?
दहशतवाद्यांची वाढती ताकद....?
का.... आपलाच हलगर्जीपणा.....?
.
.
का अजून आपण पुरावेच गोळा करतोय....!
का अजून आपण त्यांच्याशी चर्चा करतोय....!
का अजून दुसर्या देशाच बोलण ऐकतोय...!
.
.
कधी थांबणार हे चर्चासत्र...?
कधी संपणार हे कालचक्र....?
जगण मुश्कील झालय म्हणून मरण का स्वस्त झालय....?
.
.
जर आपण असच शांत राहिलो
तर आज जे घडलंय ते पुन्हा होणार
वारंवार होत राहणार.........
पिढ्यानपिढ्या जनता सोसतच राहणार.....
.
.
आणि सरकार
.
.
.
.
आणि सरकार

फक्त आश्वासनच देत राहणार.....

सागर लांडगे 

सोहळा.......

Share

हृदयात ये राणी अलगद.. परीसारखी....
गालीचा केलाय ना... या डोळ्यांचा...
ढगांवरून चालत... पावसात भिजत ये...
हळूच मनात शिरताना ...डोळ्यांमधून ये....

डोळ्यांतून मनात शिरताना... अडखळशील का तिथे...?
मग तुझा देहभरला मोगर्याचा सुगंध अनुभवत....
डोळेही उघडतील कवाडे हळूच ... राजेशाही थाटात........

पण कदाचित... मधेच ओठ बंडखोरी करण्याची शक्यता आहे...
त्यांना पण सांभाळून घे.... तुझ्या शराबी ओठांचे प्याले... थोडेसे रिते करून घे....

मग ओठही तुझ्यावर रिते होईपर्यंत बरसतील...
आणि ओठांचा तो सोहळा बघून...
डोळे लाजून अलगद मिटतील.....

मग चेहऱ्यावरचे गुलाब अजून गुलाबी गुलाबी होतील...
अन डोळेसुद्धा मग..अजून शराबी शराबी होतील...
तशीच मनात निघून ये... प्रेमभरल्या डोळ्यांनी..मेंदीच्या पानांवरून ये...

ढगांवरून येताना... दमली असशीलच...समजून घे....
मनाचा पलंग करतो राणी... थोडा आराम करून घे... :)

वाटल नव्हत कधी

Share

वाटल नव्हत कधी
असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी
माझ्या प्रेमात पडेल....

इटुकल्या - पिटुकल्या मेसेज मधून
मला वाकुल्या दाखवेल.....
हळूच एखादा MISS CALL करून
मला ती सतावेल.....

वाटल नव्हत कधी
असही कधी घडेल.....!
स्वप्नामध्ये माझ्या
हळूच कोणीतरी शिरेल.....

बोलायला "काहीच नाही" म्हणून
फोनवर तासभर बोलेल....
आणि नेमक महत्वाच बोलताना
फोन ठेवण्याची घाई करेल.....

वाटल नव्हत कधी
असही कधी घडेल.....!
माझ्याही आठवणीत
रात्रभर कोणीतरी जागेल.....

तिच्या विरहाचे चार दिवस
चार जन्माचे अंतर दाखवेल.....
आणि तास-दोन तासांची भेट सुद्धा
क्षणभर वाटेल.....

वाटल नव्हत कधी
असही कधी घडेल....!
या एकाकी जीवनामध्ये
त्या परीचा प्रेमाचा स्पर्श लाभेल......

वाटल नव्हत कधी
असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी
माझ्या प्रेमात पडेल....

बाप मरतो तेंव्हा ...

Share

सारखं वाढणारं व्याज बघून, बाप बसला चेहरा पाडून
सावकाराचा पडण्या अगोदर घाला, फाशी घेतो बोलून गेला ॥
माझ्या काळजावर झाला आघात , आईचे अश्रू मावेना डोळ्यात
म्हटलं बघावं तरी जाउन, कोणी मदत करेल का हे ऐकून ॥
पहिले भेटले एक पुढारी, चालले होते सांभाळत ढेरी,
म्हटलं साहेब बाप मरतोय, 'कसं होणार'? म्हणून आत्महत्या करतोय ॥
साहेब म्हणाले जात सांग, किती मतदान घरात सांग,
विचारून घेइन एकदा मॅडमला, नाहितर येउच शेवटी सांत्वनाला ॥
मरू नकोस सांग त्याला, एक नोट देइन मी एका मताला,
त्याला म्हणाव भागव त्यात, स्वप्न सुद्धा पाहवित की रे आपल्या आवाक्यात.. ॥
मग भेटले उद्योगपती, बसायला गाडी आणि मोबाईल हाती
म्हणालो साहेब! वाचवा बापाला, खुप खुप धन्यवाद मिळतिल बघा तुम्हाला ॥
साहेबः "सेझ ला जमीन देणार का विचार, करंजा तरी लाव म्हणावं मिळतील हजार"
हजार लाख कोटी फक्त, दिसतच नाही फाशी आणि रक्त ॥
सावकाराला देण्यापेक्षा मला जमीन दिली असती,
बापाला घर आणि तुला नोकरी मिळून गेली असती ॥
पुढे भेटला मित्र पत्रकार, वाटलं बघावा देतो का आधार,
म्हणाला माझा बाप वाचव, अन्यायाविरुद्ध रान माजव ॥
मित्र म्हणाला, तुझा बाप खाईल काय रे तीन चार साप?
तरच मी  ते छापू शकतो, जाहिरातदारांना कापू शकतो  ॥
मल हवे तीन पायाचे अस्वल किंवा एखादी नटी नखरेल,
किंवा चालेल एखादा मुलगा आणि तो बुडेल अशी बोअरवेल ॥
गेला मरून बाप तर करूया बातमी सनसनखेज,
तीन चार शो लाइव्ह करू आणि नंतर स्पेशल कव्हरेज ॥
शेवटी भेटले श्री हनुमान, कष्टी दुःखी हरपून भान
म्हणाला देवा तुमचाच सहारा, तुम्हीच वाचवा माझा म्हातारा ॥
मारुती हसला म्हटला बेटा, मलाच माझी पडली चिंता
रामाचेच अस्तित्व नाकारताहेत, तिथे हनुमानाची काय बात ॥
तुझ्या बापाची क्षमा मागतो, यमराजांशी चर्चा करतो,
मरणार तर तो आहेच, स्वर्ग तेवढा मिळतो का ते पाहतो ॥
निघालो घराकडे होउन पुर्ण हताश, डोक्यात होते प्रश्नचिन्ह मन होते निराश 
घरी बाप फाशी घेउन गेला होता, बाळांना  वाली कुणी सुद्धा उरला नव्हता ॥
लग्नात नटायचं स्वप्न, ताईच्या मनात विरून गेलं
"मेरा भारत महान", हे मात्र चांगलच मनात ठसलं ..

शुक्रवार, १ जुलै, २०११

सहारा

Share

सहारा


तुला रोज येतो कधीही शहारा
किनारी जसा वाहतो श्वास खारा


अश्या पापणीच्या तुझ्या हालचाली
अता काळजाला कसा सांग थारा


हिमालय तुझ्यावाचुनी ढासळे हा
तुझ्या वाळवंटी मला दे सहारा


कसा सावरू मी? कसा आवरू मी ?
तुझ्या अंतरी हाय माझा पसारा


तुझे आणि माझे सखे काय नाते ?
म्हणू फास की बंधनांचा पहारा


दवाचीच होती फुले जाहलेली
मुक्याने कसा बोलतो स्पर्श सारा



...कविता

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top