जगावे कशाला...??(गझल)
हसावे कशाला रडावे कशाला ?
असेही तसेही जगावे कशाला ?
उभा जन्म माझा चितेने जळाला
स्मशानात पुन्हा सजावे कशाला ?
सुखाचा सुखाला कसा दंश झाला ?
अशा वेदनांना जपावे कशाला ?
इथे थोर झाला तिथे चोर झाला
तरी सोंग घेण्या नटावे कशाला ?
खरे सांग देवा कुठे देव आहे ?
तुझ्या देवळांनी लढावे कशाला ?
क्षणाचीच माझी तुझी भेट झाली
कसे रे कसे मी उरावे कशाला ?
विझूनी निखारा खुप वेळ झाला
तुझे भास खोटे ठरावे कशाला ?
.....कविता
शुक्रवार, २१ जानेवारी, २०११
जगावे कशाला...??(गझल)
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , gazal , Marathi Gajal , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
ओढ
ओढ
वसंताची ओढ जुनी पान नव्याने बहरून आले
करपलेल्या देहावरी तुझे काळीज फुलून आले .......!!
विणले दोर तू माझ्या जीवनाचे
पीळ सात जन्माचे सुटुन गेले
ओठ तुझे रे सात सात स्वरांचे
भिजल्या अश्रुंवरी रुजून गेले .............!!
वसंताची ओढ जुनी पान नव्याने बहरून आले
करपलेल्या देहावरी तुझे काळीज फुलून आले .......!!
दूर होत्या पांगल्या दाही दिशा
खोल जखमांनी मी बुडून गेले
तेवली तुझी सावली उन्हातही
आगीमधून फुलं उमलून गेले ............!!
वसंताची ओढ जुनी पान नव्याने बहरून आले
करपलेल्या देहावरी तुझे काळीज फुलून आले .......!!
वेचलेस तू घायाळ स्वप्नांना
हुंदके श्वासातुनी झडून गेले
घेतला तू हात बेघर वादळाचा
मिटल्या जीवात सजुन गेले ............!!
वसंताची ओढ जुनी पान नव्याने बहरून आले
करपलेल्या देहावरी तुझे काळीज फुलून आले .......!!
आज .......
देवू प्रीत कशी तुला हृदयातली
युगायुगांसाठी मी तुटून गेले
तुझ्यापाशी राहिले नाते आपले
शांत या राखेत मी नटून गेले ......
पण .......
करपलेल्या देहावरी तुझे काळीज फुलून आले .......!!
करपलेल्या देहावरी तुझे काळीज फुलून आले .......!!
.....कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
भास (गझल)
भास (गझल)
तुझा वायदाही तसा खास होता
खरा कायद्याने मला फास होता
बहाणे तुझे की फुलांचे उखाणे
सुंगंधी कळ्यांना उगा त्रास होता
कधी मी कधी तू कसा खेळ आहे
खरे जिंकणे .का उगा भास होता
नको गोल अश्रू नको तीच त्रिज्या
तुझ्या वेदनांचा तुला व्यास होता
कुणी सोबतीला कुणी आज नाही
अता जीव माझा तुझ्यापास होता
चुका कालच्या माफ केल्या कशाला
सखे आजचा तो खरा श्वास होता
...कविता
लेबल: कविता , गज़ल , मराठी , मराठी कविता , gazal , Marathi Gajal , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
आवाज (गझल)
आवाज (गझल)
जुन्या वादळाचा जुना खेळ सारा
कुठे रे जळाला नवासा निखारा ?
अरे जीवना ऐक तूही जरासे
इथे फक्त रे बोलतो चोरणारा
करारात आता सह्या ठोकल्या मी
(तसा रोजचा मी मलाच विकणारा)
अजुनी सखे चालतो श्वास माझा
पहा दूरचा तो नभातील तारा
जगाला कळे आज आवाज त्यांचा
म्हणे मी उधारीस नेला नगारा
....कविता
लेबल: कविता , गज़ल , मराठी , मराठी कविता , gazal , Marathi Gajal , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
घाव (गझल)
घाव (गझल)
व्यथांनी किती सोसले आव आता
दिले टाकुनी मी तुझे नाव आता
मला दैव सांगून गेले कधीचे
तुझे नाव ठेवून घे 'घाव' आता
(घराला इथे छप्पर ना दार होते )
दिवाणाच माझ्यापरी गाव आता
चला मंडळी खूप बोलून झाले
नको रक्त ओकायचा तो डाव आता
कथा काळजाच्या कुणा ऐकवू मी
निषेधात मी नोंदला भाव आता
....कविता
लेबल: कविता , गज़ल , मराठी , मराठी कविता , gazal , Marathi Gajal , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
तू......
तू.....
धुंद धुंदश्या चांदण्याचा कहर तू
चंद्राने शिंपलेल्या रातराणीचा बहर तू
रातराणीच्या मंद कळीच्या गंधाची लहर तू
कळी पाकळीवर ओघळणाऱ्या दवबिंदूचे शहर तू
कोकिळेच्या कुंजनाचा केदार तू
प्रेम ऋतूत फुललेला वसतांचा बहार तू
पालवीच्या पानातून शहारणारा मल्हार तू
चैतन्यमयी नव्या ओजस्वी ताऱ्याचा भटियार तू
माझ्याच या हृदयाची तस्वीर तू
अंतरात दरवळणार्या श्वासात अधीर तू
तुझ्यावाचून क्षणोक्षण तळमळणारे रुधीर तू
कधी गाठणारे कधी दूर नेणारे मनाचे पैलतीर तू
गालावरच्या खळ्यांना फितूर तू
डोळ्यातले रेशमी कवडश्यांचे काहूर तू
ओठातल्या त्या शब्दांच्या अमृताचे अंकुर तू
खुळ्या खुळ्या बटांवर रुळणाऱ्या कुंकवात चूर तू
गुंफगुंफलेल्या कवितेची लकेर तू
कागदावर तुझे भास अन तू चौफेर तू
कधी मतल्यातला कधी मक्त्यातला शेर तू
रित्या रित्या शब्दांमध्ये असा भावनांचा घेर तू
आणि मी .....
मी म्हणजेच तू ........
....कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
आरोप .....नाही ....
आरोप .....नाही ....
वाटत तितक तसं काहीच सोपं नाही
तुझा माझ्यावर एक "आरोप" नाही !
सांगेन मी पण.. तू भेटशील तेव्हा
वाळवंट तुझे ..फक्त मी रोप नाही !
चोरून घे तू शाल ...."चांदण्याची "
तुझ्या चंद्राचा....मूळीच कोप नाही !
आलीस आणि ..तशी निघून गेलीस
कशी साधी तू ? जखमेस खोप नाही !
फुलाच्या कुशीत ,का वाळून गेलीस ?
वाऱ्यास तुझाही गंधित निरोप नाही !
तुझ्या निजलेल्या सावल्यांना भेटलो
स्वप्नास आता ,सुखाची झोप नाही !
सूर्य ढळताना तू म्हणाली होतीस
"नाही माझ्या कुंकवास लोप नाही" !
...कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
चूक झाली
चूक झाली
बोलले हुंदके ,आसवे मूक झाली
तुझा दोष नाही ,माझीच चूक झाली
मिठी ती फुलांची, हृदयात माळली मी
देणी घेणी पण ,अशी नाजूक झाली
तुझ्या डोळ्यात मी ,पाहिले होते मला
पाहता पाहता , सांज अंधूक झाली
आठवणीत तुझ्या ,फिरते एकटीच मी
गर्दीत मनाच्या ,दिशा घाऊक झाली
ठिणगीत रान पेटताना तू म्हणतो
'आपली भेट अगदी आपसूक झाली"
....कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
नक्षत्र
नक्षत्र
आकाशाच्या ...दूर ..दूर
नक्षत्रांच्या गर्दीतून ..
...भरदिवसा उठून आले
.......रचले ...रचले ......
कित्येक चांदण्याच्या
ठिपक्यांनी... आयुष्य रचले
...पण आज सकाळीच ....
उल्कापात झाला ...
अजून एक तारा तुटला .....
झाले झाले माझे जगून झाले .....
पुन्हा नक्षत्रांच्या गर्दीत.....
....बघ मी जावून बसले
....कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पायवाट
पायवाट
उदास उदास वाटा ---तुझा दोष नाही
बंबाळलेला काटा ---तुझा दोष नाही
सोडली साथ पावलाने गावात तुझ्या
चाललो मी एकटा ---तुझा दोष नाही
रंगीत सावल्यांची झुलणारी कमान
गंध वेदनांचा चाले श्वासात बेभान
कातरवेळ हालते ग नावात तुझ्या
भास तुझा खोटा ---तुझा दोष नाही
वादळे तुझी किनारा घेवून येतात
सागरावाचून धरणी ठेवून जातात
ओल उणिवांची असे घावात तुझ्या
परतात लाटा ---तुझा दोष नाही
बदलून गेले येथून कित्येक ऋतू
ओलांडून तुझ्या माझ्यातले सेतू
वाटले जाहले बदल डावात तुझ्या
पण रस्त्यास फुटला नवीन फाटा ---तुझा दोष नाही
.....कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
जीवनास ----
जीवनास ----
विकावे इथे लागते सर्व काही
अरे जीवना हा तुझा दोष नाही
सुनी वेदना टाक रद्दीत आता
नवा रोज तू थाट दरबार शाही
लढाईत जो तो म्हणे यास मृत्यू
तसा यास मी पोसतो बारमाही
पगारात त्या राबती चील्लरी रे
तुझी फाटकी नोट त्याचीच ग्वाही
असाही तसाही कसाही असा मी
मला ओळखीचा नसे एकदाही
...कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
वेडी म्हातारी
वेडी म्हातारी
स्वप्नात माझ्या येते
एक वेडी कुठली म्हातारी
भरडते अंधाराचे दळण
मागुनी चंद्राची भाकरी
किंचाळून हसत उठते
मधूनच मोडते बोटे चार
पिंजारलेल्या केसात
माळते दोन बोट उधार
चाहूल घेवून शून्याची
शून्यालाच मोजत बसते
शून्याला कुठल बोट ?
चवताळून चिडत उठते
फाकवून रागाचे पंख
जिभेची चिवचिव करते
जगाचा धिक्कार असो
स्वतःलाच दगड मारते
आला राग आणि गेला
कसलं काय आणि काय
उष्ट्या उकीरड्यावरच
जगत आहेत हात पाय
आखडून दोन पाय
झाकल आहे तिने पोट
रिकाम्या घागरीला
ओढत आहे आता मोट
झाकून ठेवते स्वप्न
केविलवाण्या डोळ्यात
भकास डोळे म्हणती
उरलय पाणी काळजात
पडलंय आता तिला
स्वप्न कुठल्या युगाच ?
नको दिसाया तिला
विटलेल स्वप्न माझं
.....कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
रविवार, २ जानेवारी, २०११
पाहतो गुलाब आहे
पाहतो गुलाब आहे
खुलतील हे ओठ केव्हा पाहतो गुलाब आहे
बंद बंद पाकळ्यात लाजणारा नकाब आहे
चंद्र मोजण्याचा चालला किती वेळ खेळ
रात म्हणे राणीला जागण्याची नाही वेळ
मंतरलेल्या या क्षणी काढुनी मौनाची रेघ
भेट भेटला क्षितिजाला हाय चुंबणारा मेघ
दान झाले फुलाचे फुलाने फुलाला फुलापरी
चिंब चिंबली आसवे हलके हलके गालावरी
झाले घर दूरस्थ गेली निजून स्वप्नपाखरे
थोडे थोडेसे अंथरून कोरड्या हृदयावर चरे
----कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
माझ्या मराठीत
माझ्या मराठीत
आहे माझ्या मराठीत
मर्दानी रांगडा बाणा
पिकापिकात डोलतो
धर्म शौर्याचा दाणा
आहे माझ्या मराठीत
उत्तुंग कला वारसा
मातीमध्ये उमटतो
जसा मातीचाच ठसा
आहे माझ्या मराठीत
संताची रे मांदियाळी
विठ्ठल विठ्ठल नाद
आणि एकतेची टाळी
आहे माझ्या मराठीत
जन्मलेला शिवराया
जाणली रक्ताने तेव्हा
स्वाभिमानाची काया
आहे माझ्या मराठीत
साहित्य विज्ञान ज्ञान
अनमोल हिऱ्याची जी
असे बहुमोल खाण
आहे माझ्या मराठीत
रम्य निसर्ग सोहळा
दरीदरी ओवतसे
एकेक नक्षत्र माळा
आहे माझ्या मराठीत
आमचे मराठीपण
श्वासात घुमे वादळ
वादळात गाजे रण
आहे माझ्या मराठीत
साऱ्या मायेचे शिखर
सांभाळते लेकरासी
माय भवानी थोर
....कविता
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
कलशात आठवणींच्या
कलशात आठवणींच्या
अंधारभरल्या रात्रीवरती
पांघरले कुणी दव घनांचे
कुशीत निजे अवघी धरती
अंथरले कुणी तन नभाचे
दरवळूनी अश्रुतले अत्तर
दीप नक्षत्र उजळून गेले
आले आले कवेत अंबर
गात्र गात्र पाजळून गेले
वेलीवरच्या या पानावरती
रेखाटले कुणी वार्याचे गीत
झुळझुळ झुळूक अंगावरती
हालतसे कशी हृदयात प्रीत
जागणाऱ्या या सावल्यांनो
स्वप्नास द्या थोडा विसावा
वेचुनी घ्या हा श्वास सुरांनो
अवेळी आज झंकारतो पावा
झाकोळललेल्या चंद्रावरती
उमटे नाजूकशी कळी कोर
पाण्याच्या नील रंगावरती
पाऊले टाकीत होता मोर
माळूनी शुभ्रफुले लाजण्या
चंद्रमा हा अंगणात आला
चोरुनी मधुगंधाच्या खुणा
चाफा चाफा फुलात न्हाला
विस्कटलेल्या मनावरती
जडावले होते रंग मनाचे
बंद बंदिस्त कोंदणावरती
उतरले होते कंप विजांचे
कलशात आठवणींच्या
अशीच रात्र सरून गेली
मुक्या मुक्या शब्दांनीच
कविता कोरडी भिजून गेली
....कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
|| राधे कृष्ण ||
|| राधे कृष्ण ||
चांदण्यात पौर्णिमेच्या राधा आज न्हाली
कृष्ण कृष्ण कांतीत आनंद साज ल्याली || धृ ||
झाली राधा कान्हावेडी बावरी
हसली ग सारी गोकुळ नगरी
वनावनात तरंग तरंग उठले
कोकिळेने स्वरगीत गायिले
प्रीत ही युगायुगांची झाली चिंबचिंब ओली || १ ||
.........चांदण्यात पौर्णिमेच्या राधा आज न्हाली
प्रेमकथेचा धुंद धुंद दरवळ
पर्णपल्लव करती सळसळ
असा कसा अवचित वारा
छेडतो राधेच्या हृदयतारा
गात्रगात्रात दिपतो हा सोहळा मखमली || २ ||
.........चांदण्यात पौर्णिमेच्या राधा आज न्हाली
चहूकडे होई मुकुंदाचे भास
राधा म्हणे मधुर मधुमास
कसा जीवास लागला लळा
शलाकेत दिसे मेघ सावळा
प्राजक्तात फुलून गेली कशी जाई अबोली || ३ ||
.........चांदण्यात पौर्णिमेच्या राधा आज न्हाली
आकाशाशीच जडले नाते
म्हणून डोले गवताचे पाते
वेणुतून उठले पैंजण नाद
श्याममुरारी घालतो साद
कृष्ण होई राधा, राधा कृष्णकृष्ण झाली || ४ ||
........चांदण्यात पौर्णिमेच्या राधा आज न्हाली
पहाटेच श्रीरंग रंग लुटुनी गेला
पालवीत कसा मोहरूनी गेला
स्पर्शात झुले मोरपीस केशरी
लाजली शलाका वेडी बावरी
स्वप्नास अलगद कोवळीशी जाग आली || ५ ||
.........कृष्ण कृष्ण कांतीत आनंद साज ल्याली
........चांदण्यात पौर्णिमेच्या राधा आज न्हाली
....कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
शनिवार, १ जानेवारी, २०११
सरीवर सर
सरीवर सर
नयनी तुझेच | काजळ काजळ | शमवूनी दीप | हळूच उतर |
गोंदण प्रीतीचे | नितळ नितळ | ओठ कुंकवाचा | क्षण मनभर |
सरीता निशेची | सृजळ सृजळ | नाही पैलतीर | काठास अधर |
हृदयी क्षितीज | आभाळ आभाळ | भासात गुंतले | मेघाचे झुंबर |
विसावला चंद्र | निखळ निखळ | आडोसा घेतसे | चंदेरी पदर |
श्वासात ओघ | खट्याळ खट्याळ | अडवूनी गंध | जाई दूरवर |
मनाची मनाला | ओंजळ ओंजळ | विरते शृंगार | स्पर्शाचे अत्तर |
ओथंब मिठीचा | वादळ वादळ | नौका मी डोलते | दुर तुझे घर |
गात्रागात्रात तू | वेल्हाळ वेल्हाळ | तुझी तुझीच मी | निमिष अंतर |
पहाट पहाट | मधाळ मधाळ | स्वप्न तू ओलेसे | सरीवर सर |
....कविता
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
कविता एकटी असते .......
कविता एकटी असते .......
काल पासून मनाच्या दारावर
आवाज येतो आहे ठक ठक
कुणी आहे का ? मी दार उघडलं
सवयीप्रमाणे .....माझ्या .....
विचारलं ....सवयीप्रमाणे .....
कोण ग तू ?
गुबरे गाल वर आलेलं नाक
खळग्यातले डोळे डोळ्यात खळी
गालावर कळी...केसातली पाकळी
सार कुठेतरी पहिल्यासारख
कोण ??कविता ...माझी कविता ??
पण आता का आलीस तू ???
अग सुख अनावर झाल ...
तेव्हा झेलायला आलीस ...ठीक होत
दुख ठेचकाळत होते
तेव्हा धरायला आलीस ...ठीक होत
वेदना खोल खोल गेल्या
त्यांना भरायला आलीस ...ठीक होत
भावनांची चाळण झाली
पाखडायला आलीस ...ते ठीक होत
पण आज......?? अचानक ??
का ग ?? काय झाले ??
काय म्हणतेस .....
आणि कागद म्हणजे कफन आहे ? .....
आणि प्रतिभा कल्पना वेदना ....
...साऱ्या जिवंत दफन आहेत ...
ती बघ त्यांची राख ...काळ्या शब्दातली ...
आणि ते निथळणार विष ....निळी शाई
बस्स...इतकाच न ...मग त्याचे काय ...
अग वेडे .....माहित नाही का तुला
आपल नात तर कधीच तुटल आहे
तू ....तुझा हात मला आधार ...
म्हणून ....दिलास तेव्हाच ......
आणि मी तुला आधीच सांगितलं होत
कवितेने फक्त सोबत करायची असते
सोबतीची इच्छा मुळीच नाही करायची
कारण कवितेला प्रस्तावना नसते
आणि शेवटही नाही .....
....कविता एकटी असते ...फक्त एकटी ....
....कविता (प्रस्तावना नाही शेवट नाही)
लेबल: मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
आता लिहा मराठीत
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .



