रविवार, २९ ऑगस्ट, २०१०
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात............
६:५८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०
अंतू बर्वा - पु.ल.देशपांडे.
| अंतू बर्वापु.ल.देशपांडे. ________________________________ रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरूष रहातात.देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चि~याचे, नारळ-फणसांचे,खाज~या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणा~या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शितातच ही भुतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायु नि प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायु मिसळला आहे ते त्या रत्नांग्रीच्या विश्र्वेश्र्वरालाच ठाऊक. अंतू बरवा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बरव्याला कुणी अंतू असे एकेरी म्हणावे असे त्याचे वय नव्हे. मी बाराचौदा वर्षांपूर्वी त्यांना प्रथम पाहिले त्या वेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोगट्या झाला होता. अण्णू गोगट्या होणे म्हणजे 'पडणे' हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नांग्रीचा अण्णू गोगटे वकील कित्येक वर्षे ओळीने मुन्शिपाल्टीच्या निवडणूकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोह~याचा "'अण्णू' झाला काय रे?" म्हणून अंतू ओरडतो. समोरासमोर अंतूला कोणी अंतू म्हणत नाही. परंतु उल्लेख मात्र सहसा एकेरी. किंबहुना, कोकणातली मंडळी एकूणच एकवचनी. पण अंतूला संबोधन 'अंतूशेट' हे आहे. ह्या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून ते पाप घडले होते. पहिल्या महायुध्दाच्या वेळी अंतूने बंदरावर कसले तरी दुकान काढले होते. ते केव्हाच बुडाले. परंतु 'अंतूशेट'व्हायला ते कारण पुरेसे होते. त्यानंतर अंतूने पोटापाण्याचा काही उद्योग केल्याचे कोणाच्या स्मरणात नाही. दोन वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडीशी जमीन आहे. नारळीची पाचपंचवीस, पोफळीची दहापंधरा आणि रातांबीची काही अशी झाडे आहेत. दोनपाच हापूस आंब्याची आहेत. कुठे फणस, चिंच उभी आहे. वाडवडिलार्जीत घराच्या वाटणीत एक पडवी आणि खोली आली आहे. विहीरीवर वहिवाटीचा हक्क आहे. ह्या सगळ्या आधारावर अंतूशेट उभे आहेत. त्यांची आणि माझी पहिली भेट बापू हेगिष्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेट घ्यायला गेलो होतो आणि 'केसरी'च्या मागून अर्धा जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतूशेटनी तडक प्रश्न केला होता, "वकीलसाहेबांचे जावई ना ?" "हो!" "झटक्यात ओळखलेंच मी! बसा! बापू, जावयबापूंना चहा मागवा" एकदम इतक्या सलगीत आलेला म्हातारा कोण हे मला कळेना. पण अंतूशेटनीच खुलासा केला. "तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना अंतू बरवा विचारीत होता म्हणून." "ठीक आहे !" "केव्हा आलात पुण्याहून ?" "परवाच आलो." "बरोबर. दिवाळसण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी! काय?" "तुमचे दोस्त आहेत ना, तुम्हीच सांगा." "वा! पुण्याचे तुम्ही. बोलण्यात ऐकणार काय आम्हाला! मग मुक्काम आहे की आपली फ्लाईंग व्हिजीट ?" "दोनतीन दिवसांनी जाईन !" "उत्तम ! थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कपोसकर वकिलाच्या जावयासारखं नका करू. त्यानं सहा महिने तळ ठोकला. शेवटी कपोसकर वकिलान् एक दिवस खळं सारवायास लावलं त्यास ! जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसं ?" "बरोबर आहे !" "बापूशेट, ओळखलंत की नाही ? आमच्या वकिलांचे जावई ! आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार हो !" हेगिष्ट्यांनी नमस्कार केला. "चहा घेता ?" "नको हो, उकडतंय फार !" मी म्हणालो. "अहो, रत्नांग्रीस उकडायचंच. गोठ्यात निजणा~यान् बैलाच्या मुताची घाण येते म्हणून भागेल काय ?" शेवटला 'काय?' वरच्या पट्टीत उडवीत अंतूशेट म्हणाले, "रत्नांग्रीस थंड हवा असती तर शिमला म्हणाले नसते काय आमच्या गावाला ? पण उकाड्याचा तुमच्या सड्यावर अधिक त्रास ! दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग नि थेट या आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे एअरकंडिशन हो !" मनमुराद हसत अंतूशेट म्हणाले. वर आणि "आमचा कंट्री विनोद हो जावयबापू" हेही ठेवून दिले. "बापूशेट, पाहुणे लेखक आहेत हो. आमच्या आबा शेट्यासारखी नाटकं लिहिली आहेत. फार बोलू नका. नाहीतर तुमच्यावर लिहीतील एखादा फर्मास फार्स !" अंतूशेट बर्व्यांपर्यंत माझी कीर्ती पोहोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापूशेट हेगिष्ट्याच्या प्रश्नाने मावळला. मला नीट न्याहाळीत बापूशेट म्हणाले, "काय करतात ?" "करतात काय म्हंजे ? खुळे की काय तुम्ही हेगिष्टे ? ती रद्दी काढा. दहा ठिकाणी फोटोखाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला. सिनेमात असतात." "म्हणता काय ?" हेगिष्टे माझ्याकडे 'अजि म्यां ब्रह्म पाहिलें' असा चेहरा करून पाहत म्हणाले. "काय हो जावयबापू, एक विचारू काय ?" मिस्किल प्रश्नाची नांदी चेह~यावर दिसत होती. "विचारा की ----" "एक सिनेमा काढला की काय मिळतं हो तुम्हाला ?" मी काही कोकणात प्रथमच आलो नव्हतो; त्यामुळे ह्या प्रश्नाला मी सरावलो होतो. "ते सिनेमा-सिनेमावर अवलंबून आहे." "नाही, पण आम्ही वाचलंय की एक लाख दीड लाख मिळतात ..." "मराठी सिनेमात एवढे कुठले ?" "समजा ! पण पाच पूज्यं नसली तरी तीन पूज्यं पडत असतीलच ..." "पडतात... कधीकधी बुडतात ही !" "अहो, ते चालायचंच ! धंदा म्हटला की चढणं नि बुडणं आलं. आणखी एक विचारू काय ? ...म्हणजे रागावणार नसलात तर..." "छे, रागवायचं काय ?" "सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते खरं असतं की आपलं गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं ?" "हे जे काही म्हणजे ?" मी उगीचच वेड पांघरले. "वस्ताद हो जावयबापू ! कोर्टात नाव साक्षीदार म्हणून नाव काढाल ! अहो, हे जे काही म्हणजे तर्जनीनासिकान्याय यातला प्रकार म्हणतात ते..." हा तर्जनीनासिकान्याय माझ्या ध्यानात आला नाही. शेवटी अंतूशेतनी आपली तर्जनी नाकपुडीला लावीत साभिनय खुलासा केला. तेवढ्यात हेगिष्ट्यांनी मागवलेला चहा आला. "घ्या" अंतूशेटनी माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे, झंप्या ?" असे म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला आणि बशीत चहा ओतून फुर्र फुर्र फुंकायला सुरवात केली. वास्तवीक त्या पो~याला चहात दूध कमी आहे हे त्यांना सरळ सांगता आले असते. पण अंतूशेटचेच काय, त्यांच्या सा~या आळीचे बोलणे तिरके. अंतूशेटचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या दहाबारा वर्षांत मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलो तितक्या वेळा मी त्यांना भेटलो. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमवूनही घेतले. एकदोनदा गंजिफा शिकवायचा प्रयत्नही केला. आणि त्या साठीच्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतूशेट आणि त्यांचे सांगाती यांचे जीवनविषयक अचाट तत्वज्ञान मी खूप ऐकले. त्यांची विशिष्ट परिभाषा तिथे मला कळली. खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वहाण,एका हातात दंडा नि दुस~या हातात फणस घेऊन , "रे गोविंदभट, टाकतोस काय दोन डाव ?" किंवा "परांजप्या, जागा आहेस की झाला तुझा अजगर ?" अश्या आरोळ्या मारीत पत्त्यांतले भिडू गोळा करणा~या त्या मंडळीत मीही भटकलो. पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की पाने टाकून, "जावयबापू, म्हणा एखादा मालकंस. गडबोल्या,कूट थोडा तबला पाव्हण्याबरोबर. खातूशेट, उघडा तुमचा खोका." असल्या फर्माईशीनंतर मी आवाजही साफ करून घेत असे. "नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या !" ही दाद इथेच मिळे. वर्षा-दोन-वर्षांतून एखादी फेरी रत्नागिरीला घडे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळाल्याचे कळे. "दामूकाका दिसले नाहीत कुठे अंतूशेट !" "कोण ? दामू नेना ? तो चैनीत आहे ! वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान् वारा घालते म्हणतात." "म्हणजे ?" "अहो, म्हंजे वाघाचे पंजे ! दामू नेन्याची रत्नांग्रीहून झाली बदली !" असे म्हणून अंतूशेटनी आकाशाकडे बोट दाखवले. "अरे अरे अरे ! कळलं नाही मला." "अहो, कळणार कसं ? दामू नेना चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहेत ? केसरीत आला होता गृह्यसंस्कार झापून. मनमिळाऊ, प्रेमळ व धर्मपरायण होते असा ! छापणारे काय, द्याल ते छापतील. दामू नेना कसला प्रेमळ ? ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आठी तशीच ! एके रात्री उकडतांय घरात म्हणून खळ्यात झोपला तो तिथेच संपलेला आढळला पहाटे ! पुण्यवान माणूस. गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठालोकी. रत्नांग्रीत दोन पालख्या निघाल्या आषाढीला --- एक विठोबाची नि दुसरी दामू नेन्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला आमच्या दत्तू परांजप्यान् सीमोल्लंघन केलेनीत. अवघ्या देहाचं सोनं झालं. इजा झाला, बिजा झाला, आता तिजाची वाट पाहतोय !" मिष्किलपणाने खांदा उडवीत अंतूशेट म्हणाले. पाच फुटांच्या आतबाहेरची उंची, तांबूस गोरा वर्ण, तोंडावर बारीक वांगाचे ठिपके, घारे मिचमिचे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या सुरकुत्या, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघाभर पंचा, पायांत कोकणी वहाणा, दातांची अर्धी पंगत उठून गेलेली, त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना जीभ लावीत बोलायची खोड आणि ह्या साजासकट वजन सुमारे शंभर पौंड. ह्या सगळ्या जराजीर्ण होत चाललेल्या गोष्टींत एक गोष्ट ताजी म्हणजे सानुनासिक परंतु सुस्पष्ट आवाज आणि डोक्यावर पिढ्यान् पिढ्या थापलेल्या खोबरेल तेलाने दिलेली वंशपरंपरागत तैलबुद्धी ! अंतूशेटच नाही, तर त्या आळीतले त्या वयाचे सारेच नमुने कमीअधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा आडवळणाचे. भाषेला फुरश्यासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवयच झालेली. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाहीच; वाईट झाल्याचे दुःख नाही. जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. गाण्याची रुची नाही, तिटकाराही नाही; खाण्यात चवीपेक्षा उदरभरण हाच स्वच्छ हेतू ! आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कुरकुरली नाही, आहे म्हणून वेगाने पळली नाही. चाल मात्र कोकणी वाटेसारखी सदा नागमोडीची. नशिबात अश्वत्थाम्याघरच्या पिठाच्या दुधाची वाटी ! त्याच्या घरी दुधाचे पीठ झाले. इथे देवाने नारळीचा कल्पवृक्ष दिलेला. पण त्यातल्या खोब~याहून करवंटीची सलगी अधिक ! उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते. "कशी काय गर्दी ?" "ठीक आहे !" "प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात ?" "छे ! छे !" "अहो, छे छे म्हणून झिटकता काय पाल झाडल्यासारखे ? पहिला अंक ऐकला मी हितूनच. सिंधूच्या पार्ट्यात काय दम दिसत नाही तुमच्या. 'लागे हृदयीं हुरहुर' म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलंनीत. बालगंधर्वाचं ऐकलं होतंत काय ?" नेहेमीप्रमाणे शेवटला 'काय' उडवीत अंतूशेट म्हणाले. मॅनेजरही जरा उखडले. "आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा." "गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत --- आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षतदेखील घेऊन हिंडत होते तुमचे ब्यांडवाले! अहो, एवीतेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं --- चार आण्यात जमवा." "चार आण्यात बघायला काय डोंबा~याचा खेळ आहे काय ?" "अहो तो बरा ! आधी खेळ तो दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. पुढलं 'कशि या त्यजूं पदाला' जमलं फक्कड तर थाळीत चार आणे आणखी टाकीन." बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर उखडला. तेवढ्यात अंतूशेटची नजर माझ्याकडे वळली. "नमस्कार हो जावयबापू..." "नमस्कार !" "काय जमलाय काय 'एकच प्याला' ? " "ठीक आहे !" "फुकट पासात की काय तुम्ही ? बाकी तुम्हीही त्यांतलेच. एक न्हावी दुस~या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात." "'नाही हो. हे पहा तिकीट आहे." "'मग 'ठीक आहे' म्हणून मुळमुळीतसं उत्तर दिलंत ? दमड्या मोजल्या आहेत ना तुम्ही ? तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला." "अहो, सिंधूचा पार्टी कसला ? बाई आहे ती काम करणारी." "सांगताय काय ? कसला तो आवाज नि कसलं ते दिसणं ? मनात आणील तर कडेवर घेईल सुधाकराला. सिंधू कसली ? सिंधूदुर्ग आहे मालवणचा नुसता." "पाहिलंत वाटतं नाटक ?" "उगीच जरा. त्या कोप~यातली दोन झापं बाजूला करून पाहिलं घटकाभर... छ्याः ! ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे." काही कारण नसताना आपल्या मताची एक पिंक टाकून अंतूशेट निघून गेले. बाकी अशा दिवसरात्र 'पिंका' टाकीतच त्यांचे आयुष्य गेले. अंतूशेटची माझी आता इतक्या वर्षांची ओळख, परंतु त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मला फारसे कधीच कळले नाही. त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सान्यांनी एकदाच फक्त काही माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतूशेटच्या मुलाची उल्लेख आला. "'म्हणजे ? अतूशेटना मुलगा आहे ?" "आहे ? म्हणजे काय ? चांगला कलेक्टर आहे !" "'कलेक्टर ?" "भायखळ्याच्या स्टेशनावर तिकिटं गोळा करतो." चेह~यावरची सुरकुती हलू न देता अण्णा म्हणाले. "मग वडलांना मदत करीत नाही की काय ?" "अहो, करतो कधी कधी. त्यालाही त्याचा संसार आहे. त्यातून बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलेला ..." ह्या अड्ड्यातले हे विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयाल होईल. बी बी सी आयला जी आय पीचा डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह हे लक्षात यायला मला उशीर लागला. "काय लक्षात आलं ना ? तेव्हा अंतूशेटच्या स्नानसंधेची पंचाईत होते. मुलाच्या घरी थोडी इतर आन्हिकंही चालतात म्हणे. आमच्या अंतूशेटचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाहण्यास गेला होता. गणित चुकल्यासारखा परतला. दसरा-दिवाळीला अंतू बर्व्याला मिळतं आपलं मनिऑर्डरीतून पितृप्रेमाचं पोस्त ! पाचदहा रुपयांचं ! तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप म्हणून सांगत ! आणि उगीचच खुर्दा खुळखुळवतो चार दिवस खिशात हात घालून." "अहो, तिकिट-कलेक्टरला पगार तो काय असणार ?" "पगार बेताचाच, पण चवल्यापावल्यांची आचमनं चालतात म्हणतात. खरंखोटं देव जाणे. आणि चालायचंच ! घेतले तर घेऊ देत .. काय ? अहो, आठ आणे खाल्ले की चौकडीचा मुगूट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि एक लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत ! लोकनियुक्त प्रतिनिधी !" राजकारण हा तर अंतूशेटच्या अड्ड्यातला लाडका विषय ! प्रत्येक राजकीय पुढा~यावर आणि तत्वप्रणालीवर मौलिक विचार ! कोकणात दुष्काळ पडला होता. तसा तिथे नेहमीच दुष्काळ. पण हा दुष्काळ अंतूशेटच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'फ्यामिन आक्टान्वये पास झालेला'! दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चालला होता. गावात धामधूम होती. कोणीतरी संध्याकाळी अंतूशेटना विचारले, "काय अंतूशेट? भाषणास दिसला नाही !" "कुणाच्या न्हेरूच्या ? छ्याट् ! अरे, दुष्काळ पडला हितं .. तर भाषणं कसली देतोस ! तांदूळ दे.! हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणा~या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतोय आणि हा हितं ... ह्याचा त्यास उपयोग नाही आणि त्याचा ह्यास ! तुम्ही आपले खुळे. आला न्हेरू चालले बघायास ! आणि रत्नांग्रीत दाखवलनीत काय त्यास ? बाळ गंगाधर टिळक जन्मले ती खोली आणि खाट ? गंगाधरपंत टिळकास काय स्वप्नात द्रष्टांत झाला होता काय रे ... तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार म्हणून ? कुणाची तरी खाट दाखवली नि दिलं ठोकून त्याच्यावर टिळकानं पहिलं ट्यां केलं म्हणून ! पुरावा काय ? का टिळकाच्या आयशीचं बाळंतपण केलेली सुईण होती साक्षीस ? टिळकाचं सोड ! शंभर वर्षं झाली त्याच्या जन्मास. तू जन्मास आलास ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय ? म्हातारीस विचारून ये घरी जाऊन आणि मग सांग मला टिळकाच्या आणि न्हेरूच्या गोष्टी." मला नेहमी प्रश्न पडे, की ह्या मंडळीची आदराची स्थानं कोणती ? गावात पंडित आला की त्याला 'पढिक' म्हणून उडव. "बाजारात जाऊन पैशाचं लिंबू आणायास सांग. स्तंभाजवळच्या लायब्ररीत जाईल आणि तिथे मागेल लिंबू !" कुणाचा मुलगा प्रोफेसर झाला हे ऐकल्यावर अंतूशेट चटकन म्हणाले, "सर्कशीत काय हो? पूर्वी एक छत्रे प्रोफेसर होता." कुणी नवे दुकान काढले तर "दिवाळ्याचा अर्ज आत्ताच मागवून ठेव म्हणावं !" हा आशिर्वाद. जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याली आहेत देव जाणे. त्यांतली निम्म्याहून अधिक माणसे मनिऑर्डरीवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य कवच ! कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतूशेटनी आपले भाष्य सुरू केले. "अहो, कसला गांधी ? जगभर गेला, पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो ! त्यास नेमकं ठाऊक --- इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्याहीपेक्षा उघडे ! सुताबितात तथ्य नाही हो ! आमचा शंभूशेट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला ! ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही ! तिसरं शस्र म्हणजे उपासाचं ! इथे निम्मं कोकण उपाशी ! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हांस कसलं ? नाही, माणूस असेल मोठा... पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर ? आणि स्वराज्याचा म्हणाल तर संबंध गांधीशीही नाही, टिळकांशीही नाही नि सावरकांशीही नाही." "म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं ?" "ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा ! पण इंग्रज गेला कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं ? धंदा बुडीत खाती जायला लागला --- फुकलंनीत दिवाळं ! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं. सत्ता इंग्रजाची नाही, न्हेरूची नाही आणि जनतेची नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची !" "मग तुमचा विश्वेश्वर इंग्रजाच्या ताब्यात कसा गेला ?" "खुळे की काय तुम्ही ! विश्वेश्वर घट्ट आहे राजिवड्यावर ! अहो, एक खेळ करून दाखवला त्यानं." "दीडशे वर्षांच्या गुलामीचा कसला खेळ ?" "'अहो दीडशे वर्षं तुमची ! ब्रह्नदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान् देखील सरकत नाही हजार वर्षं ओलांडल्याशिवाय !" कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. "अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला." अश्या वेळी अंतूशेटच्या जिभेवर लक्ष्मी नाचते. "बरोबर आहे !" "उगीच तोंडदेखलं बरोबर आहे म्हणू नका त्या श्यामराव मुरकुट्यासारखं ! चुकत असेल तर कान उपटा ! तुम्ही माझ्याहून लहान खरे, पण शिक्षणान् थोर आहात." अंतूशेटच्या असल्या भाषणात केवळ तिरका विनोद नसतो. त्यांचे कुठेतरी काहीतरी जळत असते. गेल्या चारपाच वर्षांत रत्नागिरीला फार वेळा जाताच आले नाही. आता तिथे वीज आली, कॉलेज आले, डांबरी रस्ते आले, मी दोनतीन वर्षांपूर्वी गेलो तेव्हा अंतूशेटना म्हणालो, "अंतूशेट, रत्नागिरी झकपक झाली हो तुमची ! विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज ?" "छे हो, काळोख आहे तो बरा आहे. ! उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय ? दळिद्रच ना ? अहो, पोपडे उडालेल्या भिंती नि गळकी कौलं बघायला वीज हो कशाला? आमचं दळिद्र काळोखात दडलेलं बरं !" अंतूशेट मनमुराद हसले. या खेपेला दातांचा जवळजवळ संपूर्ण अण्णू गोगट्या झालेला दिसला. शिवाय अड्ड्यातली आणखीही एकदोन मंडळी 'निजधामाला' गेल्याचे कळले. कधी नाही ती एक कारुण्याची नि गोडव्याची झाक अंतूशेटच्या बोलण्यात मला आढळली. अड्ड्यातल्या रिकाम्या जागा त्यांच्या मनात कुठेतरी घर करून जात असाव्या. ''जोगळेकरांचा मुलगा दिल्लीस बदलला हो वरच्या जागेवर." अंतूशेट आपण होऊन सांगत होते. ''म्हाताऱ्याला काशीविश्वेश्वर, हरिद्वार-ह्रृषिकेश घडवून आणलंनीत. मावंदं घातलं जोरदार शंभू जोगळेकरान् ! गंगेच्या पाण्याचा लहानसा गडू शिलबंद करून आठवणीन् घेऊन आला माझ्यासाठी ! पुढच्या खेपेला याल तेव्हा त्याचं शिल फोडून गडू आमच्या तोंडात उपडा झालेला दिसेल हो जावयबापू." पहिल्या भेटीतले संबोधन अजून कायम होते. त्यानंतर गेल्याच वर्षी पुन्हा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. अंतूशेटच्या घरचा गंगाजलाचा गडू सुदैवाने सीलबंदच होता. "वा वा ! कांग्रेचुलेशन हो जावयबापू ! कळलं आम्हांला. जाऊन या हो. एक रिक्वेष्ट आहे. आता इंग्लिश बोललं पाहिजे तुमच्याशी." "कसली रिक्वेस्ट ?" "तेवढा कोहिनूर हिरा पाहून या. माझी आपली उगीचच तेवढी इच्छा राहिली हो ! पिंडाला कावळा नाही शिवला तर कोहिनूर कोहिनूर म्हणा. शिवेल ! परत आल्यावर सांगा कसा दिसतो. लंडन, प्यारिस सगळं बघून या." मला उगीचच त्यांच्या पाया पडावे असे वाटले. मी रस्त्यातच त्यांना वाकून नमस्कार केला. "आयुष्यमान् व्हा ! श्रद्धाळू आहात, म्हणून यश आहे हो तुम्हाला." मी निरोप घेतला आणि चार पावले टाकली असतील, लगेच हाक ऐकू आली. "ओ जावयबापू --- !" "काय अंतूशेट ?" "जाताय ते एकटेच की सपत्नीक ?" "आम्ही दोघेही जातोय." "हे चांगलं केलंत ! उगीचच एक किडा आला डोक्यात. म्हटलं, परदेशी विद्या शिकायला निघाला आहात --- देवयानीची कथी आठवली. काय ? आमच्या मुलीलाही आशिर्वाद सांगा हो ! तुमचं भाग्य तिच्यामुळं आहे. तुम्हांला म्हणून सांगतो. मनात ठेवा हो. कुठे बोलू नका. चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून ह्या घटकेपर्यंत मोहरला नाही. शेकड्यांनी आंबा घेतलाय एके काळी त्या आंब्याचा. पण भाग्य कुठल्या वाटेनं जातं बघा. असो. सुखरूप या. इथून प्रयाण केव्हा ?" "उद्या सकाळच्या एस.टी.नं जाणार !" "डायरेक्ट मुंबई की काय ?" "हे चांगलं केलंत ! एकदा तो प्रवास घडला की त्या चिकाटीवर माणसांनी पृथ्वीप्रदक्षिणा करून यावं. परवा वरच्या आळीतला तात्या जोग जाऊन आला --- अजून हाडांचा हिशेब जमवतोय. सातआठ हाडं हरवली म्हणतो त्या यष्टीत." अंतूशेट सगळे तोंड उघडून हसत होते. आता त्या तोंडात एकच दात लुकलुकत होता. पहाटे पाच वाजता एस.टी. स्टँडवर अंतूशेटची "जावयबापू" ही खणखणीत हाक ऐकू आली. मी चकितच झालो. अंतूशेटनी वैद्याच्या पुडीसारखी एक पुडी माझ्या हाती दिलीय. "तुमचा विश्वास नाही, ठाऊक आहे मला. पण एवढी पुडी असू द्या तुमच्या खिशात. विश्वेश्वराचा अंगारा आहे. विमानातून जाणार म्हणून कळलं वकीलसाहेबांकडून. एवढी पुडी जड नाही खिशाला." एस.टी. सुटली आणि अंतूशेटनी आमच्या कुटुंबीयांबरोबर सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. तेवढ्या अंधुक प्रकाशात त्यांचे ते खपाटीला गेलेले पोट चटकन माझ्या डोळ्यावर उगीचच आघात करून गेले. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील --- खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात. |
८:११:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०
जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन
| जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन तेव्हा एक कर तू निःशंकपणे डोळे पूस. ठीकच आहे, चार दिवस- उर धपापेल, जीव गुदमरेल. उतू जणारे हुंदके आवर, कढ आवर. उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक घर कर मला स्मरून कर, हवे तर मला विस्मरून कर. |
८:०९:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
माणूस वाचणारा कवी
८:०८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
हंबरून वासराले चाटती जवा गायं : नारायण सुर्वे
८:०३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
सत्य :: नारायण सुर्वे
८:००:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
दोन दिवस : नारायण सुर्वे
दोन दिवस : नारायण सुर्वेदोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले। |
७:५७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मना सज्जना!
| - डॉ. जोसेफ मर्फी ज्यावेळी तुमच्यातील अंतर्मनाच्या शक्तीची जाणीव होईल, त्यावेळी तुम्हाला तुमचं जीवन अधिक बलशाली बनविता येईल. तुम्ही तुमच्या जीवनात अधिक चांगलं आरोग्य, अधिक संपत्ती, अधिक आनंद मिळवू शकाल. परंतु, तुम्हाला अंतर्मनाच्या शक्तीचा वापर कसा करायचा, हे शिकायला हवं... ................ जगात अनेकांच्या जीवनांत अद्भुत चमत्कार घडल्याचं आपण पाहतो. तुमच्या जीवनातही असे घडू शकते. अर्थात त्यासाठी तुम्हाला अंतर्मनातील शक्तीचा वापर करणं आवश्यक आहे. तुम्ही आसपास जर बारकाईनं पहिलं तर, तुम्हाला असं दिसून येईल की, एक माणूस आनंदी आहे, तर दुसरा दु:खी. एकाची आथिर्क भरभराट होत आहे, तर दुसरा आथिर्क संकटात. एक चिंतेत आहे, तर दुसरा सर्वकाळ आनंदानं बागडत आहे. एखाद्याकडे सुंदर घर, तर दुसरा झोपडपट्टीत. एखादा असाध्य रोगाचा बळी, तर दुसरा निरोगी... अनेक विरोधाभास माणसामाणसांत तुम्हाला दिसेल. असे विरोधाभास दिसण्यामागे काही कारणं आहेत का? होय, त्यामागे कारणं आहेत. नव्हे, तुम्हीच त्याला कारणीभूत आहात! ही कारणं शोधण्यासाठी मनाचं दार उघडायला हवं. या दारातून तुम्ही डोकावताच आत दडून असलेली अमोल संपत्ती दिसायला लागेल. अनेकांना या संपत्तीची जाणीव नसते. त्यांना अंतर्मनात डोकावून बघण्यास वेळ नसतो. त्यामुळे ते अंतर्मनात डोकवायला तयार नसतात. परिणामी त्यांना जे काही हवं असतं, ते मिळत नाही. साधा लोखंडाचा तुकडा घ्या, त्यात चुंबकीय शक्तीचा अंतर्भाव करून पाहा. त्या छोट्या तुकड्याला किती बळ प्राप्त होतं, ते तुमच्या लक्षात येईल. लोहचुंबकाचा हा छोटा तुकडा स्वत:च्या वजनाच्या बारापट अधिक वजनाचं लोखंड सहज उचलू शकतो. त्या चुंबकीयशक्तीमुळे त्याला किती बळ आलेलं असतं. परंतु, त्या लोहचुंबकातून चुंबकीय शक्ती काढून टाका आणि काय होतं ते पाहा. त्याला एखाद्या पक्ष्याचं साधं पीसही उचलता येणार नाही. लोखंड आणि लोहचुंबकाप्रमाणे माणसांचेही दोन प्रकार. एकामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. त्या आत्मविश्वासाच्या बळावर तो कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतो. त्याला वाटतं, आपण यशासाठी, जिंकण्यासाठी जन्मलो आहोत. त्याच्यात जणू चुंबकीयशक्तीच सळसळत असते. दुसऱ्या प्रकारच्या माणसांमध्ये उत्साह नसतो. त्याच्यातील जणू चुंबकीय शक्ती काढून घेतलेली असते. ते नेहमी भीती, संशयानं पछाडलेले असतात. एखादी संधी त्याच्याकडे अगदी चालून आली तरी त्यांना त्या संधीचा लाभ उठवून घेण्यात भीती वाटते. मी अपयशी ठरलो तर, माझे पैसे बुडाले तर, लोक मला हसले तर, अशा अनेक शंका त्यांच्या मनात घोंघावतात. अशी माणसं जीवनात यशस्वी होत नाहीत. त्यांच्या मनातील भीतीमुळे ती पुढे येत नाहीत. आहेत तिथेच राहतात. जर एखाद्यानं तुम्हाला विचारलं, जगातील सर्वांत गहन रहस्याचं नाव काय? तुम्ही त्यावर काय उत्तर द्याल? अणुशक्ती? परग्रहांवरील प्रवास? अवकाशातील कृष्णविवरं? नाही, या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं, साधं आहे. हे उत्तर तुमच्यातच आहे. त्याचं उत्तर आहे, तुमचं अंतर्मन. होय, जगातील सर्वांत गहन रहस्य आपलं अंतर्मन आहे! तुम्हाला अंतर्मनातील शक्तीची जाणीव होईल, त्यावेळी तुम्हाला जीवन अधिक बलशाली बनविता येईल. तुम्ही जीवनात अधिक चांगलं आरोग्य, अधिक संपत्ती, अधिक आनंद मिळवू शकाल. ही शक्ती बाहेरून मिळवावी लागत नाही. ती तुमच्या शरीरातच आहे. परंतु, तिचा वापर कसा करायचा, हे शिकायला हवं. तुम्हाला त्याची एकदा समज आली की तिचा सहज वापर करता येईल. अंतर्मनाची शक्ती म्हणजेच इच्छाशक्ती. या शक्तीद्वारेच शारीरिक आणि आथिर्कदृष्ट्या दुबळे झालेले अनेक सबळ बनले आहेत. संकटांवर मात करून पुन्हा उभे राहिले आहेत. यालाच आपण चमत्कार म्हणतो. असा चमत्कार आपल्या जीवनात घडावा, असं वाटत असेल तर अंतर्मनातील शक्तीचा वापर करण्यास शिकलं पाहिजे. त्यासाठी काही तत्त्वं आहेत. या तत्त्वांची माहिती असणं आवश्यक आहे. जसं दोन भाग हैड्रोजन आणि एक भाग ऑक्सिजन म्हणजे त्यापासून पाणीच बनणार. हे पाणी सर्वांच्या जीवनाचा आधार बनतं. तर एक भाग ऑक्सिजन आणि एक भाग कार्बन यांच्यापासून कार्बन मोनोक्साइड हा विषारी वायूच बनेल, या वायूमुळे सर्वांचं जीवन धोक्यात येईल. हे निसर्गनियम आहेत. आपल्या अंतर्मनासाठीही नियम आहेत. मनाचा नियम किंवा श्रद्धेचा नियम असं त्यास म्हणू शकतो. तुमच्या मनात जसे विचार निर्माण होतात, त्यानुसार तुमचं अंतर्मन काम करतं. त्यानुसार तुम्हाला अनुभव येतात, घटना घडतात. तुमच्या विचारांच्या या सर्व प्रतिक्रिया तुमच्या अंतर्मनात उमटत असतात. ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता, त्या गोष्टीमुळे हे घडत नसतं तर तुमच्या स्वत:च्या मनात जो विश्वास होतो, त्यामुळे हे घडतं. तुम्ही चांगला, शुद्ध विचार करत जा, जीवनातील शाश्वत सत्यावर व गुणांवर विश्वास ठेवत जा, मनातील भीती काढून टाका, अंधश्रद्धा बाजूला सारून चांगल्या पवित्र श्रद्धा मनात बाळगा, योग्य प्रार्थना करा, तुम्हालाही चांगलं जीवन जगता येईल, तुमच्या जीवनातही चमत्कार घडेल! .......................................................... अनुवाद : जॉन कोलासो |
७:३९:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा
| दोन मिनिटे नक्की द्या!
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा शाळेने पत्रक काढलं, 'यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल!' आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की, अगदी एक विजार,एक सदरा असेल, तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात. गरीब मुलगा शोधायचा कसा? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती. तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं,जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची. मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं, "मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले, "सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं,तो सर्वात गरीब आहे." मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?" "सर.त्याचा सदरा दोन-तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो. तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर,ती भाकरीही कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो, तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी." मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली.पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल?की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, "पाहिलंस!हे सातवीतल्या मुलाचे अक्षर. असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते. उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे..." उत्तर पत्रिकेचे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे. असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो... अरेरे!..., मी खूप कमी पडतोय. मयूर, गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही..! असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता. यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता! शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले. 'मयूर जाधव, सातवी अ, अनुक्रमांक बेचाळीस' डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, "खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश... इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे." मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, "सर,त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूर जाधवच आहे !" एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही. दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता. त्यावर 'गरीब असूनही आदर्श' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला. त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा... "सर,रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका." "अरे,काय बोलतोयस तुला समजतय का?" "चुकतही असेन मी. वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव...!!" त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा,डोळ्यातलं पाणी ...... मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत,तो असा.....? "सर,मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे." त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती. येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती. "अरे पण....?" "सर, विश्वास ठेवा. मी श्रीमंत आहे. कदाचित सर्वात श्रीमंत असेन... सर,मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज." अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, "ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?" "सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत. पुस्तकं मी Second Hand वापरतोय... खरयं! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत. सर...सर, सांगा ना, मी गरीब कसा?" मयूर मलाच विचारत होता आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं. "खरयं मयूर.पण तुला या पैशाने मदतच......." "सर,मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन ! " "म्हणजे?" "वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो.सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात... मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते..... म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर,मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगळे काम करतात. काम म्हणज कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात. आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर,वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो ते कळतच नाही.... शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर,माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु.ल.देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. . .......सर, आहे ना मी श्रीमंत?" आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्या~या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं." त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. अभावितपणे मी विचारलं, "व्यायामशाळेतही जातोस?" "सर, तेवढी फ़ुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो." अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा. "मयूर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा...." "म्हणूनच म्हणतो सर......!" "हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून,हे पारितोषीक तरी...." "सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या. मी लिंकनचं, सावरकरांचं चरित्र वाचलं, हेलन केलरचं चरित्र वाचलं. सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!" वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं, कलेच्या स्पर्शानं, कष्टानं....... त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती, संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते. शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून,परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत ! सर्वात श्रीमंत!!! |
७:३८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .







