रात्रीची अघोर विराणी, झोपूच देत नव्हती
उगाच काही नकोसे पोरखेळ मनात जागे झाले
असंख्य वर्षांपासून हेच करायच होत कदाचीत ..
बाहेर लख्ख अंधार आहे ..
कुणीही नसावं,
खोलीत फक्त मी, आणि एकटीच तावडीत सापडलेली विराणी रात्र ..
तिच्या पदराला हात घातला
तेव्हां तिने एकही आवाज केला नाही,
तिलाही हेच हवं होत कदाचीत,
मग सोलपटून काढलेल्या कातीसारखं ..
मी खोल खोल शिरत राहिलो ..
कितीक वेळ ..
तिने मात्र हुंकारही दिला नाही ..
वाऱ्याची झुळूक तेवढी प्रकर्ष झालेली आठवते ..
तिने एक कुचकट कटाक्ष टाकला मग माझ्याकडे ..
कसा कुणास ठाऊक ? मला अंधारातही जाणवला तो ..
दोघांची मने विवस्त्र .. अंगांसकट ..
ती मात्र ह्याच पिंडाची असावी !!
थकत गेलो मीच फक्त ..
तिच्या दोन्ही ध्रुवांवर काबीज होप्ण्याची ताकद नाहीच अंगात ..
करायलाच हवं .. अथवा पुरुषार्थ तोकडा सिद्ध होईल
तेव्हा काळीमा झालेली रात्रीसमोरची माझी मुद्रा,
मलाच नको असेल ..
कदाचीत ह्याच भितीने ..
मी अजुन करतच राहिलो ..
तेव्हा रात्रीचे दोन्ही पाय सरकवून माझ्यावरच खुष होऊन मी अजुन पुढे सरकलो ..
ती मात्र ....
अजुन एकही हुंकार नाही ??
मला माझीच चीड येत गेली ..
तिच मात्र तेच कुचकट हसू ..
.....................................................
"तुला लाज नाही"?
या प्रश्नावर तिच पुन्हा एक तेच हसू...
मग माझी मलाच वाटलेली असीम लाज ..
आणि पुन्हा एक कुचकट हसू ..
आता मी लाख म्हणालो तरी रात्रीने मला सोडायला हवं ...
ती अगदीच निरलज्ज बनून अजुन चढतेच आहे ..
काळोख अजून घट्ट होतोय ..
बाहेर तीच शांतता ..
खोलीत फक्त तिच्या सळसळण्याचे आवाज ..
आणि माझ्या हरण्याचे ..
तिच्या केसांमधे विस्कटत गेलेला अंधार
आण माझ्या छातीवर पडलेल्या त्या अंधाराचे काही अवशेष..
त्या निलारजेचा हाच पिंड असावा
आता बास कर ..
हरलो मी, तुझ्या सामर्थ्यापुढे मान टाकली ..
मीच काय परंतु माझ्याजागी ब्रम्हदेव असता तरी हेच केल असत गं त्याने ..
तुझी ताकद ओळखायला चुकलोच म्हण हवं तर ..
उगाच नाही सगळ्या जगाला व्यापतेस तु ..
पुरुषार्थ तोकडा पडलाच अखेर ..
हवं असेल तर माफीच मागू का ?
फुकाच्या सामर्थ्यात ठेवलय तरी काय ?
...............................
पण ती ऐकेल तर ना !
ती पुन्हा कुचकट हसते आणि अजुन घट्ट होत जातो काळोख
आणखीन घट्ट
काही क्षणांपुर्वी मी आवळलेले बाहुपाश,
आता मला आवळू लागतात
मी काकुळतीने माफी मागतोच आहे ..
आणि रात्र मात्र ...
रात्र मात्र अजुन वैरीण होऊन चढतेच आहे ..
खोल खोल उतरतेच आहे
माझी गात्रे कधीची शिथील पडलीयेत ..
आणि ती मात्र न जाणे कुठलं आवसान आणुन अजुनही चढतेच आहे ..
...............................
आधी हुंकारही न देणारी रात्र आता किंचाळु लागते ..
मी घाबरतो ..
ती अजुन किंचाळते ..
तेव्हां तिच्या "त्या" रूपाला बघुन मी मात्र घाबरून जातो ..
अशीही असते का रात्र ?
"बास कर, मरेन मी नाहीतर .."
तिला हेच हवं होत कदाचीत
खोलीत फक्त दुहेरी आक्रोश .. एक तिच्या किंकाळ्याचा आणि एक माझ्या काकुळतीचा
तेव्हा शुभ्र संगमरवरी असणारे थेंब देखील कृष्ण असावेत ?
नक्की काय घेऊन आली होती ही रात्र ?
एका अगदीच जीवघेण्या रात्रीने ..
जीवघेण्या पद्धतीने..
माझाच जीव घ्यावा ?
पुन्हा एकदा विरोधाभास ...
चुकलो मात्र ..
हरवु शकलो नाहीच तिला ..
ती मात्र पदर सावरीत जातांना देखील,
अगदी तसच कुचकट हसु फेकुन गेली ..
आणि मी मात्र तसाच .. हरलेला .. जिंकण्याच्या नादात ..
अखेर तो दुहेरी आक्रोश संपलाच ...
तिच्या किंकाळ्यांचा देखील, आणि माझ्या काकुळतीचा देखील ..
तिला हेच हवं होत कदाचीत..
खरंच ..
अशीही असते का रात्र ?
................................................
घरातल्या भिंती एकमेकांशी काहीतरी उगाच कुजबुजत रहातात ...
मला असह्य होत ते ...
"उद्या दिवसाच्या उजेडात बघुन घेईन एकेकाला"
हा विचार येताच .. पुन्हा अंधाराची पैजणं,
खुलेपणाने किनकिनलेली जाणवतात ..
ते दीड क्षणांच अवसान कुठे जात कुणास ठाऊक ?
................................................
कदाचीत अशीच असते रात्र ..
एकटेपणाने राक्षस झालेली
या खेपेस मी होतो ..
कदाचीत पुढच्या खेपेस अजुन कुणी ...




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा