बरसला रे पाऊस
झाले अंगणाशी तळे
प्रीत फुलात नहाता
गंध जमिनीचा कळे
तो-
तुझ्यासवे भिजताना विसरलो मी पाऊस
सरींवर सर पडे, नको एकटी जाऊस
ती -
आज अबोली बोलते, संगे बोलतो मोगरा
ओल्या ऋतुला गीतांचे आज चढवु साकडे
मनासवे नहातांना
गंध जमिनीचा कळे
ती -
ढग बोलतात सख्या, सांज लाजलेली गाली
ओठ नभाचे भिडता, क्षितिजाला आली लाली
तो -
तुझ्या गालांवर थेंब असे पडतात आज
मोती होऊन तयांचे आज झालेच सोहळे
मनासवे नहातांना
गंध जमिनीचा कळे
तो -
आज गुलाबाच्या गाली दवधुक्याचे नवल
चिंब पाकळी पाकळी, चिंब सखीचा पदर
ती -
बरसला गं पाऊस, भान हरवले माझे
चिंब झालेल्या मिठीशी मिठी सजणाची पडे
मनासवे नहातांना
गंध जमिनीचा कळे




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा