Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, २९ एप्रिल, २००९

इच्छापत्र

Share

इच्छापत्र
माणूस म्हणून मी
कणाकणा ने संपतोय
भावनांचे ओलावे
अन्
शब्दभंडार
आता रिते झालेत
काळ बदललेल्या वाळवंटात
सावल्या मृगजळामागे
धावू लागल्यात
आता त्या कविता प्रसवत
नाहीत,
शब्दाना गार्‍हाणे घालून
कवितेचा कौल मिळत नाही.

माझ्या अपूर्ण आयुष्यात
पूर्णांक नसेलही परंतु
आता काहीच तडीस जात नाही
हा अंत आहे वा प्रतिभेचा र्‍हास
हेच असेल तर
इच्छापत्राची वाट मोकळी करणे
गरजेचे आहे.

माझा उरलेला सहवास मी
माझ्या धूक्यात दडलेल्या गावास
अर्पण करतो,
आईची चोळी कधी माझ्यासाठी
ओली झाली असेल ती उरलेली
ओल मी विधेवेच्या मोकळ्या
केशसंभारात माळतो
प्रेयसीने दिलेल्या चुंबनाचा गोडवा
रात्र जागणार्‍या वारांगणेवरुन
ओवाळुन टाकतो.

प्रेयसीला नाकारलेल्या प्रेमाचा
अंश,
प्रतारणे नंतरही तिने केलेली मोकळी वाट
गर्भपातानंतर तिने गाळलेले आश्रू
ह्यांचे देवार्पण व्हावे
अन् माझी रक्षा पात्रास मिळताच
त्यानी रक्षेस कवेत घ्यावे.

ज्या मित्रांच्या मैत्रीत
आबालालाजी रेहमानान्ची अमूर्तता
होती
ज्यांच्या आलिंगणात
आधाराची ओढ होती
ते सारे सारे मी वार्‍यावर उधळायला
तयार आहे,

माझ्या शब्दांची "ग्रेस " मी कवितेच्या
दानपेटीत टाकतो,
माझ्या कवितांचे गूढार्थ मी हिरे
म्हणून ताजमहालवर चिटकवायला
तयार आहे
माझ्या कवितांच्या विटान्चे
थडगे झालेच तर मी माझे
शरीरही द्यायला तयार आहे.

फक्त इतकेच लिहा
थडग्यावर :
" मन कशात लागत नाही
आदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झार्‍यावर रात्री
मज ऐकू येतो पावा "

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top