पावसाची एक गंमतच असते…
तो बाहेर बरसायला लागला,
की आतही सरी सुरू होतात…
नकोसा नसतोच तो कुणाला
उलट खूप वाट पाहायला लावून
उन्हात होरपळून गेल्यावरच येतो तो…
येतो तेव्हा मात्र झिंमड उडते,
सरी कोसळत राहतात,
आत आणि बाहेर…
भिजवून टाकतात आपल्याला चिंब
सारं काही स्वच्छ होतं मग
आतून आणि बाहेरून…
पावसाचं हेही एक चांगलंय…
तो आतल्या पावसाला सांभाळून घेतो
आतला डोळ्यांवाटे बरसतो तेव्हा
हा त्याला पदराआड दडवतो…
मग डोळेही होतात धुके धुके
बाहेरचा आत कधी येतो
आणि आतला बाहेर कधी येतो
समजतच नाही…
कदाचित यालाच अद्वैत म्हणत असावेत…
म्हणूनच म्हणतो…
या पावसाचीही एक गंमतच असते…





0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा