साहिल..किनारा..त्याचं नावही प्रिय अन तोही..
त्याला नसेल माहित किंवा असेलही....
त्याला माहित नसेल माझ्या मनात काय आहे त्याच्यासाठी ? असं जर असेल तर मग सारंच व्यर्थ.
कलंडत्या सूर्याकडे बघत बसलेल्या जान्हवीच्या मनात मात्र मध्यान्हीचा सूर्य तळपत असतो.
खडकाळ किनार्यावर लाटांवर लाटा आदळत असतात.तिच्या मनातल्या विचारांच्या लाटांशी स्पर्धा करत…
मन सैरभैर झालं की एकटीने समुद्रकिनारा गाठायचा,ही तिची नेहमीचीच सवय होती.
आजूबाजूस दाटणार्या तमाची तर तिने कधीच तमा बाळगली नव्हती.
बस्स समुद्रकिनार्यावर यायचं आणि आणखीन एक गुपित समुद्राच्या स्वाधीन करत त्याला आणखीन खारटवायचं….नेहमीचंच झालं होतं आता हे.तिने तर एक कविताही त्या समुद्राला अर्पण केलेली होती....
कधी खवळलेला
कधी शांत
कधी उधाणलेला
आगीच्या गोळ्याचा निवारा
असंख्य गुपितं पचवत खारटलेला
नसतोस कधी तहानलेल्याचा
असतोस त्या परप्रकाशी चांदुल्याचा
त्याच्या लहरीवर लहरी उठवणारा
भरती घेऊन येतोस अन माझं रेतीचं घर मोडतोस
ओहोटीला दूर- दूर माझं तनमन रितं करुन जातोस
माझ्या फळकुटाच्या नौकेत मला झुलवतोस
सुन्न राती खडकांना चुंबत मला भुलवतोस
नक्षत्रात शंख-शिंपल्यांची भेट मला देतोस
बेबंद होत माझ्या गावातही घुसतोस
तरी,
मी विसावते तुझ्याच समीप
जरी तू माझा कधीच नसतोस
कारण,
जगाने बुडवलेल्या
मला
तू किनारा तरी देतोस....
................
जान्हवीचं विचार चक्र चालूच होतं..
किती विचित्र असतं नाही आयुष्य..कधी काय घडेल सांगता येत नाही.
काल परवापर्यंत कामगार संघटनेत किती प्रिय होता साहिल सर्वांचा,किती मानायचे त्याला सगळे.
आणि आज..आज नकोसा झालाय तो त्याच्याच मित्रांना.
नालायक आहेत साले….म्हणे साहेबाने पैसे चारले तुला म्हणून त्याच्या बाजूने बोलतो.म्हणून संप मिटवा म्हणतोय.
काय पुरावा होता त्यांच्याकडे साहिल विरुध्द ?
शून्य..
कामगारांच्या मागण्यांसाठी त्यानेच संप पुकारला होता पण मिटवायलाही किती प्रयत्न करत होता तो !
ते फक्त हत्यार होतं मॅनेजमेंट विरोधात..मागण्या मान्य करुन घेण्यासाठी..
कामगारांची कुटूंब काय रस्त्यावर थोडी आणायची होती त्याला ?म्हणून संप मिटवूया म्हणत होता तो.
मॅनेजमेंटशी बोलून काही मागण्या मान्य करुनही आणल्या होत्या त्याने.पण,कोणा चहाटळांनी अफवा पसरवली आणि सगळे त्याच्यावर उलटले.
विचार करता करता अधिकच बेचैन होणार्या जान्हवीचं मन भूतकाळात जातं.
आजही आठवतो तो दिवस..
कंपनीत मुलाखत द्यायला गेले होते.
बसमध्येच त्याच्याशी ओळख झाली होती.साधंसं रुप,निर्मळ बडबडा स्वभाव.सहप्रवासी म्हणून किती छान गट्टी जमली होती आमची.
तो तिथेच काम करत होता आणि मलाही तिथं काम मिळावं ही त्याची इच्छा होती.
अन तसंच झालं सुध्दा.माझं सिलेक्शन झालं आणि मीही कंपनीत लागले.
वेगवेगळ्या शिफ्टसमुळे सतत भेट होईल असेही नसायचे.
पण,जेव्हा पण भेटायचो किती आनंदी व्हायचो दोघेपण !
अगदी भांडायचोही. मुलींवरुन कधी कधी मित्रांबरोबर त्याच्या टवाळक्या चालायच्या,मी नाराज होऊन अबोला धरायचे.पण,त्याचा स्वभावच असा होता..तो मला मनवून घ्यायचा.
पण त्याच्या स्वभावातली एक गोष्ट मात्र मला सतत खटकली..तटस्थता.आणि सर्वांशी जुळवून घ्यावं असं त्याला वाटे.ह्या मुद्द्यावरुन कित्ती वाद होत आमचे !
मी नेहमी त्याला म्हणायचे,"चांगली माणसं गैरसमजामुळे,परिस्थितीमुळे वाईट वागली तर त्यांना दूसरी संधी जरुर द्यावी.जे मुळात वाईट आहेत त्यांना दूरच ठेवावं.कारण,अशी माणसं कधीही घात करु शकतात.चांगल्याच्या बाजूने उभं रहायची वेळ येते तेव्हा तडफदारपणे उभं राहावं"
मी असं काही बोलले की मंदसा हसायचा.तेवढंच,शेवटी जे करायचं आहे तेच करायचा..
आमची अशी छान मैत्री होती पण कधी मैत्रीपलीकडे गेलो नाही.
आजही आठवतं,
कंपनीत वर्धापनदिनाचा कार्यक्रम होता.साहिलने गिटारवर " नीले नीले अंबर पे चांद जब आये" वाजवलं होतं..त्याने झंकारलेली प्रत्येक तार माझ्या मनाला तार तार करत होती.एकाच क्षणी जगणं आणि मरणं काय असतं हे मी अनुभवलं होतं.त्या दरम्यान माझ्या अन त्याच्यातल्या नजरानजरेत कितीतरी ठिणग्या उडाल्या होत्या.परत ते क्षण कधीच आले नाहीत..की आम्ही येऊ दिले नाहीत ?
ना कधी कुठे भेटणं,ना एकमेकांच्या घरी येणं जाणं,ना फोन.
आजही एव्हढं सगळं झालंय,एक फोन नाही ना ठरवून भेट.
कधी कधी असं जरुर झालं की,त्याच्या अन माझ्या या जवळकीतल्या दुराव्याचा मला शोध घ्यावासा वाटला.
कित्येक हळव्या क्षणी त्याची आठवण येऊन जायची आणि त्याची आठवण येताच क्षण हळवे होऊन जायचे.मन भरुन यायचं पण..
मी आजवर सतत नाकारत राहिले पण,
पण ,
आज....आज कबुल करतेय..
ह्या मावळत्या सूर्याच्या साक्षीनं..
ह्या उधळत्या लाटांच्या जल्लोषात..
ह्या उगवत्या शुक्राच्या चांदण्यात..
कुणासाठी उध्वस्त होण्याला जर प्रेम म्हणत असतील तर..
हो,हो...करते प्रेम मी तुझ्यावर..खुप खुप जीव लावते तुला....
तुझ्या आयुष्यात "ती" असून देखील….
....
सामाजिक नातं भावनिक नात्यापेक्षा श्रेष्ठ नाही..
पाणावलेले डोळे पुसत जान्हवी हुंदका गिळते..
किती सहजतेने बोलता येतं ना हे..पण,शेवटी सर्वप्रथम माणूसच असतो ना आपण ! हुंकारणारं ह्रदय घेऊन माणूस आधी जन्माला येतो मग शरीराने समाजाशी जोडला जातो.
मग ह्या ह्रदयाला कुणाविषयी जे वाटतं त्याची काहीच किंमत नाही ? की आयुष्यभर फक्त समाजासाठी जगत राहायचं,ढोंगीपणे..
हो ढोंगीपणेच..कारण दगड मातीच्या घरात राहायचं एकाबरोबर आणि धडधडत्या ह्रदयात मात्र कुणी दुसरंच..
आवडतो मला तो..बस्स.एवढंच तर आहे..
आणि त्याच्यावरच्या ह्या प्रेमाखातर आज मीही त्याच्याचपाठी उध्वस्त झालेय.
त्याच्यावर संघटनेशी गद्दारीचा आळ आला ,संघटनेबाहेर फेकला गेला तो.
मी कशी गप्प राहणार होते ? सगळ्यांना समजावण्याचे प्रयत्न केले,अगदी भांडले सुध्दा.
त्याच दरम्यान केबिनबाहेर त्याच्याशी बाचाबाची करणार्या साहेबाच्या भावाबरोबर त्याने हाणामारी केली,त्याची बाजू घेऊन साहेबाकडे गेले तर तो खवळला.त्याला तर साहिलसारखं आव्हान संघटनेत नकोच होतं.मग त्याची साथीदार म्हणून माझीही नोकरी गेली.घरचेपण नाही नाही ते बोलले.
काल त्याच्याविषयी त्याच्या मित्रांकडे विचारलं तर म्हणे दुसरीकडे नोकरी शोधतोय तो.
कुणी म्हणे,साहेबाला भेटायला बंगल्यावर गेला होता..काय सांगावं ?कदाचित त्याला परत घेतीलही..माफी मागितली तर..
तसं ह्या सगळ्या प्रकारानंतर त्यादिवशी एकदा भेटला रस्त्यात अचानक तेवढंच काय ते !
शांत होता..
माझी एवढी चांगली नोकरी गेल्याचं दु:ख त्याच्याही डोळ्यांत होतंच.
म्हणे..आशावादी बन,हे ही दिवस निघून जातील.मिळेल तुला दूसरी नोकरी..
औपचारिकच सारं..निघून गेला..
हो मिळेल रे..नोकरी जाण्याचं दु:ख नाही.
पण,आज मनात खुप काहुर माजलंय..
तुला कामावर परत घ्यावं,संघटनेत परत मान मिळावा,तुझं महत्व पटवून देत म्हणूनच मॅनेजमेंटशी बोलले होते मी.
तुझ्या तळमळीने सगळ्यांविरोधात उभी राहिले होते.....तुला न विचारता.....तुझ्याशी एकनिष्ठ होते.
तूही पाहत होतास..तुला जाणवलं नाही असं होऊच शकत नाही.
पण एकमेकांशी ह्याबाबतीत काहीच बोललो नाही.
मला तुझ्या मन:स्थितीची कल्पना होती.काय बोलणार तुझ्याशी ?
पण आज,अचानक ह्या दाटून आलेल्या आभाळागत भलत्याच विचारांनी मनात थैमान घातलंय..
तुझ्यावर असलेली माझी निष्ठा कमकुवत नाही पण..
जर तू कधी म्हणालास..
" माझ्यासाठी जगाच्या विरोधात जा..असं नव्हतो म्हणालो मी तुला..जो काही निर्णय घेतलास तो सर्वस्वी तुझा होता "..तर..
तर मात्र मी कोसळूनच जाईल.
जगाचे घाव हसत हसत सोसेल माणूस पण आपल्याच माणसाने दिलेले घाव……..संपवतात.
नि:श्वास सोडत जान्हवी घरी जायला निघते,वळून पाहते.शहर दिव्यांनी झगमगलेलं असतं.
ती परत समुद्राकडे पाहते,दूरवर एका जहाजातला टिमटिमता प्रकाश दिसत असतो.
निष्ठा माझी नक्की कुणाशी होती ? माणसाशी की तत्वांशी ?
With whom I was Loyal ? Towards Man Or My Ethics ?
नक्कीच उत्स्फूर्तपणे माणसाच्याच बाजूने तर उभी राहिले होते.पण माझी तत्वं..ती त्या माणसाच्या बाजूने उभी होती.
मग त्याने जर कधी माझं बलिदान नाकारलं तर खचून जायची भीती का वाटते मला ?
आणि का नाकारेल तो ? मित्र आहे माझा..इतक्या वर्षांपासूनचा..मला एवढंही ओळखत नसेल ?
त्याचे मित्र म्हणत होते,साहेबाच्या बंगल्यावर गेला होता तो..कदाचित माफी मागण्यासाठी...
आणि संघटनेत तर काय त्याचे मित्रच होते..राग निवळेल..कदाचित जुळतीलही मनं परत..
मग त्याला जर परत कंपनीत घेतलं मग..काय मीही माफी मागायला जाऊ साहेबाकडे ?
नाही..जान्हवी झुकणार नाही अशा हलकटांपुढे..मी साहिलला साथ दिल्याने कित्ती वाईट आरोप केलेत त्यांनी माझ्यावर..
संतापाने जान्हवी थरथरत असते.
मॅनेजमेंट,संघटनेतलं लोक सार्यांच चुकलं तर होतंच..
आणि लोकांना जमत असेल भंगलेल्या आरशात छबी पाहणं,मला नाही.
मी नाही जाणार परत तिथे..
आणि मैत्री ?
भरुन आलेल्या आभाळातल्या गढूळ चांदण्यात काहीतरी शोधत तिची नजर हरवते..
तू उलटणार नाहीस माझ्यावर..विश्वास वाटतो रे..पण,जरी............
तरी , तत्वांशी प्रामाणिक राहणं मी सोडणार नाही..
आणि तुझ्यावर प्रेम करणं ? ते तर माझ्या हातात नाहीच आहे रे..
विचारांच्या लाटा आदळून आदळून जखमी झालेल्या किनार्यावरुन जान्हवीची पावलं घराच्या दिशेने निघतात....
सोमवार, ६ जुलै, २००९
निष्ठा - Loyalty ( लघुकथा )
१:३८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: मराठी कविता , मराठी गोस्टी , लघुकथा , marathi gosti , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: मराठी कविता , मराठी गोस्टी , लघुकथा , marathi gosti , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा