Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २० मे, २०१०

जय महाराष्ट्र! Majha Maharashtra

Share

महाराष्ट्र हे भारतातलं असं एकमेव राज्य आह
ज्याच्या नावात 'राष्ट्र' हा शब्द आहे.
ही 'राष्ट्र'भावना केवळ नावातल्या अक्षरातच नाही
तर महाराष्ट्राच्या जनमानसात खोलवर रुजलेली आहे.

इथल्या संतांचा मार्ग भक्तीचा, योद्ध्यांचा मार्ग शक्तीचा,
तपस्वींचा मार्ग तृप्तीचा तर कलावंतांचा मार्ग आसक्तीचा.
या साऱ्यांनी इथे राहणाऱ्या लोकांच्या मनात
या देशाविषयी, भाषेविषयी, साहित्य, कला, संस्कृतीविषयी
आपुलकी निर्माण केली आणि अस्मिताही.
म्हणूनच हा महाराष्ट्र त्यांचे प्रेमही झाला आणि प्रेरणाही!

या महाराष्ट्राच्या भूमीतच राम वनवासात राहिला
आणि या भूमीने परशुरामाचा पराक्रम पाहिला!

या इथे पुंडलिकासाठी परब्रह्मा अवतरले
आणि इथेच तुकोबांचे अभंग इंदायणीच्या डोहात तरले!

इथे ज्ञानोबांनी त्यांचा 'मराठाची बोलु कौतुके' बोलिला
आणि इथेच नामा, सावता, सेना, चोखा, गोरा, सखू,
जनादिक संतांनी चंदभागे तिरी डाव मांडिला!

इथे बुरसट परंपरावर नाथांच्या भारूडांचे आसूड फुटले
आणि इथेच परकियांच्या पारतंत्र्याचे ग्रहण सर्वप्रथम सुटले!

इथे रामदासांनी भक्तीला शक्तीची जोड दिली
आणि चक्रधर स्वामींनी महानुभवाची ओढ दिली!

या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य
उभारले
आणि याच भूमीतल्या सदाशिवरावभाऊंनी
दिल्लीचा तख्त फोडण्यासाठी बाहू उगारले!

या भूमीचा भगवा झेंडा अटकेपार फडकत राहिला
आणि याच भूमीतल्या क्रांतीकारकांनी
आपल्या मस्तकांचा हार स्वातंत्र्यदेवीला वाहिला!

इथे गवतालाही भाले फुटले आणि
इथेच औरंगजेबाच्या महत्त्चाकांक्षांचे पंख तुटले!

छत्र नाही, सिंहासन नाही, राजा नाही, शासन नाही,
तरीही अठ्ठावीस युगे दोन्ही हात कमरेवर ठेवून
उभ्या असलेल्या पांडुरंगाचे वारकरी धारकरी झाले.

ते अठ्ठावीस वर्षं आपल्याहून हजारोपट दुश्मनांशी
दोन हात करत या महाराष्ट्रातच लढले!

इथल्या लेण्यातल्या दगडांवर कलेचे काव्य उमटले
आणि इथेच हजारोंनी एका सूरात
'चले जाव'च्या चळवळीचा मंत्रही म्हटले!

इथले कर्मवीर, धर्मवीर, स्वातंत्र्यवीर सदैव लोकमान्यच झाले
कारण महाराष्ट्राने कधीच आपली वेगळी चूल मांडली नाही,
तापल्या तव्यावर आपली पोळी भाजली नाही,
आपलीच टिमकी कधी वाजवली नाही,
आणि म्हणूनच महाराष्ट्राची महती फारशी कधी गाजली नाही.

महाराष्ट्राने देशाला दिशा दिली,
इतरांनी त्या देशाची दशा केली.

महाराष्ट्राने नव्या पाऊलवाटा घडवल्या,
इतरांनी फक्त मखमली पायघड्या तुडवल्या.

महाराष्ट्र देशाच्या गळ्याला ताईत बनला
तरी देशाने महाराष्ट्राच्या मस्तकावर
मानाचा शिरपेच कधीच नाही ठेवला.

पण महाराष्ट्राला त्याची खंत नाही.

कारण महाराष्ट्र हा भारत नावाच्या राष्ट्रपुरुषाचा,
तळपती तलवार, बळकट मुठीत धरलेला उजवा हात आहे.
महाराष्ट्राचा आपल्या बुद्धीवर, सार्मथ्यावर, पराक्रमावर
विश्वास आहे.

आपल्या कर्तृत्वावर, कौशल्यावर, कलेवर प्रेम आहे.
आपल्या राकट सौंदर्यावर, अफाट निसर्गावर, तिखट
भाषेवर जीव आहे.

पण या सगळ्यापेक्षा आणि सगळ्याहून अधिक
महाराष्ट्र कर्तव्यनिष्ठ राष्ट्रभक्त आहे.

म्हणूनच या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या
सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने
महाराष्ट्राच्या मानकऱ्यांसाठी
गायलेला हा पोवाडा!

जय हिंद, जय महाराष्ट्र!


0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top