Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २० मे, २०१०

पिंकी सायकॉलॉजिस्ट झाली!

Share

पिंकी सायकॉलॉजिस्ट झाली!

एक दिवस शाळेच्या दारापुढे एक चकचकीत गाडी येऊन उभी राहिली. त्यातून उंची कपडे घातलेले आई-वडील आणि एक मुलगी उतरले व त्यांनी शाळेच्या द्वारात प्रवेश घेतला. लगेच लक्षात आलं की नवीन प्रवेश आहे.

तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाली आणि पिंकीचा शाळेत प्रवेश झाला. पिंकी म्हणजे नुसतं वारं, एका वर्गात एका ठिकाणी बसणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये मिसळणार नाही. थोडीशी रुळल्यावर तिची बुद्ध्यांक तपासणी केली. बुद्ध्यांक बॉर्डर लाईन मतिमंदत्व दाखवत होत्या. वय ९ वर्षं असल्याने काही गोष्टी स्पष्ट कळत नव्हत्या, त्यामुळे ही मतिमंद नाही तर बदमाश असं मत बहुतांश लोक करायचे आणि तिच्यावर चिडचिड करायचे. पालक हा बुद्ध्यांक मानायला तयारच नव्हते. सगळ्यांच्या, स्त्री असो वा पुरुष, कोणाच्याही जवळ जाणार, अंगाला हात लावणार. पुरुषांच्या खिशात हात घालून पाहिजे ते काढून घेणार, सगळं वर्णन वातावरणाला न शोभणारं, विसंगत. इतक्या मोठ्या प्रमाणात वर्तनसमस्या, की सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हतं.

हिच्या मनाविरुद्ध केलं तर ही काहीही उपद्रव करणार हे लक्षात घेतलं आणि तिला वैयक्तिक वर्तन, परिवर्तनाचं प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. विविध वर्तनसमस्यांची तंत्रं आणिअ पालकांशी समुपदेशन यांचा मेळ घालण्याचा आटापिटा सुरू होता, हळूहळू कौटुंबिक समस्या समोर येत होत्या. आईवडिलांमध्ये आईवडिलांमध्ये या पाल्यामुळे मतभेद होते. आई एका पारंपारिक कुटुंबातील आदर्श सून होऊ की या मुलीच्या वागण्याकडे लक्ष देऊ या मन:स्थितीत अडकलेली, तर वडील अतीशय महत्वाकांक्षी. व्यापारात तरबेज आणि प्रचंड यश मिळवत चाललेले. त्यात एकुलत्या एका मुलीवर प्रचंड प्रेम, भरपूर पैसा खर्च करणारे.

या सगळ्याचा मेळ बसवायचे काम हातात घेतले. सगळ्यात आधी पिंकी. पिंकीला वर्गात बसायला आवडत नाही हे लक्षात आल्यावर सरळ, "तू हुशार आहेस ना? मग आजपासून तू माझी मदतनीस!" म्हणून हाताशी घेतले. सहज, अलगद, तिच्या कळत-नकळत समुपदेशन करणे आणि काम देणे- जसे 'कपाटातून टेस्ट काढ'. कशी-कोणत्या प्रकारची हे तिच्या हळूहळू लक्षात येऊ लागले. कोणत्या टेस्टला कोणते नाव आहे, टेस्टिंग चालू असताना मुलांना कोणत्या सूचना द्यायच्या, कॅल्क्युलेटर कसे वापरायचे, स्कोअर कसा करायचा हे ती शिकत गेली. रिकामपणामुळे, अति लाडामुळे निर्माण झालेल्या वर्तनसमस्या नाहिशा झाल्या. तिच्या वर्तनातल्या बदलाने आईवडलांमध्ये असणारे मतभेदही कमी झाले आणि मुख्य म्हणजे पिंकीला शाळेत यावेसे वाटू लागले.

शिक्षक दिनाच्या दिवशी पिंकीने सायकॉलॉजिस्ट बनून पालकांचे I.Q सुद्धा काढले आणि हळूहळू प्रवाहाचा एक भाग बनली. तिला पैशाचे अत्यंत आकर्षण होते. पण पैशाचा व्यवहार तिला जमत नव्ह्ता. तो तिला शिकवला आणि ती आवडीने शिकली.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top