Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, ५ सप्टेंबर, २००९

आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे

Share

आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

-कुसुमाग्रज

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top